सध्या सगळीकडे वर्ल्डकपचा फिव्हर आहे. न्यूझीलंडला हरवत टीम इंडियाने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. आता वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये वर्ल्डकपसाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. रविवारी(१९ नोव्हेंबर) होणाऱ्या वर्ल्डकप फायनलसाठी क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटीही उत्सुक आहेत.
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही क्रिकेटप्रेमी आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. सिद्धार्थने टीम इंडियाला सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी टेचा ना. २००३ चा बदला असा घेतला पाहिजे ना आपण की ते परत आलेच नाही पाहिजेत. ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आले याचा मला खरं तर आनंद झाला आहे. ते टफ टीम आहेत.पण, आपले लोकही उत्तम क्रिकेट खेळतात." सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तो 'झिम्मा २' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कबीर ही भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या तो 'झिम्मा २'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिद्धार्थबरोबर या चित्रपटात क्षिती जोग, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुहास जोशी या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत.