आज २७ मार्च 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नाटकावर भरभरुन प्रेम करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) खास व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) हे मंचावर उपस्थित आहेत. संकर्षणने व्हिडिओ सोबत छान कॅप्शनही दिलं आहे आणि गुरुंचे आभार मानले आहेत.
सध्या संकर्षण 'नियम व अटी लागू' या नाटकामध्ये काम करत आहे. तो स्वत:च या नाटकाचा लेखक आहे. प्रशांत दामले यांनी नाटकाची निर्मिती केली आहे तर चंद्रकांत कुलकर्णी हे दिग्दर्शक आहेत. याच नाटकाच्या शुभारंभाचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. याखाली कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “जागतिक रंगभूमी दिन” तुम्हा सगळ्यांना अनंत शुभेच्छा..खरंच रंगभूमी वर वावरण्यासारखं सुख नाही.. अनंत जन्माची पुण्यायी म्हणुन हे भाग्यं मिळतं..''
संकर्षणने आजच्या या खास दिवशी अभिनेते प्रशांत दामले यांचेही आभार मानलेत. 'तू म्हणशील तसं' नंतर आता 'नियम व अटी लागू' या नाटकासाठी संकर्षण त्यांच्याबरोबर काम करत आहे. त्याला लेखनाची संधी देणारे प्रशांत दामलेच होते. तर नुकतेच प्रशांत दामलेंनी आपल्या कारकिर्दीत एकूण 12500 प्रयोग करत विक्रमी रेकॉर्ड केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या या विक्रमाचा सोहळा पार पडला होता.
1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.