समीर नाईक
पणजी: गाेवा हे माझे सर्वांत आवडते ठिकाण आहे. मी येथे कित्येक वर्षांपासून येत आहे. हे ठिकाण असे आहे की, कामानिमित्त आलो तरी सुट्टी घालवायला आलो आहाेत, असेच नेहमी वाटंत, येथील संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ हे खरंच मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता देऊन जातात, येथील लोकही खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
मी इफ्फी महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते. यंदा ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट घेऊन मी इफ्फीत दाखल झाली आहे, त्यामुळे अधिक आनंद होत आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ हे चित्रपटाचे नाव असले तरी, खऱ्या अर्थाने लॉकडाऊनसारखे जास्त काही नाही, उलट या काळात आशेचे किरण असलेल्या गोष्टींवर आम्ही जास्त भर दिला आहे, प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट आवडणार आहे. या चित्रपटाला ‘इफ्फी’सारखे व्यासपीठ मिळत असेल, त्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही, असे सई यांनी यावेळी सांगितले.
थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोलताना सई म्हणाल्या की, क्रिकेट आणि चित्रपट हे भारतीयांच्या नसानसांत आहे. त्यांना कुठलेही व्यासपीठ चालते. ओटीटी एक ठराविक गोष्टीसाठी उपयुक्त ठरू शकते, परंतु चित्रपट हे लोकांना थिएटरमध्येच पाहायला आवडतात, हे आता प्रदिर्शित झालेल्या चित्रपटांच्या यशातून दिसून येते. कोरोनाकाळात काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचे होते, त्यामुळे ओटीटी चांगला पर्याय होता, परंतु आता गाडी हळूहळू रुळावर येत आहे.
कोकणी भाषा मला खूप जवळची वाटते. या भाषेतून जर एखाद्याने मला ओरडले तरी ती मनाला भावते, एवढी छान भाषा आहे. मी अनेकदा ही भाषा माझ्या मित्रासोबत बोलते. त्यात जर मला कोकणी चित्रपट करायला मिळाला, तर नक्कीच मला आवडेल, आणि मी आवर्जून कोकणी चित्रपट करणार आहे, असे सईने सांगितले.