Yash Chopra and Pamela Chopra Love Story : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यश चोप्रा आणि पामेला यांचं लग्न १९७० साली झालं हाेतं. दोघांची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग होती.रेडिफला दिलेल्या मुलाखतीत पामेला यांनी आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. आमचं प्रेम काही पहिल्या नजरेतलं प्रेम वगैरे काही नव्हतं, असं त्या म्हणाल्या होत्या. यश चोप्रा आणि पामेला यांची पहिली भेट दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. पामेला त्यावेळी आपल्या चुलत बहिणीसोबत तिथे आल्या होत्या. जी प्रचंड सुंदर होती. यश वारंवार तिच्याकडेच बघत असल्याचं पामेलांना जाणवलं होतं. पण नंतर ते आपल्या चुलत बहिणीला नाही तर आपल्यालाच बघत असल्याचं त्यांना कळलं होतं. पुढे पामेला आणि यश चोप्रा एका लग्नाच्या संगीत सोहळ्यात पुन्हा भेटले. या संगीत सोहळ्यात पामेलांनी एक गाणं गायलं होतं आणि यश यांनी त्यांचं कौतुक केलं होतं.
पामेला आणि यश यांचं कुटुंब आधीच एकमेकांना ओळखत होतं. अशात फॅमिली फ्रेन्ड रमेश शर्मा यांच्या आईने दोघांच्या लग्नाचीजुळवून आणलं होतं. त्यांनी यश यांच्या वहिनीकडे दोघांच्या लग्नाचा विषय काढला आणि यानंतर यश पामेलाला पुन्हा भेटायला राजी झालेत. अर्थात ही औपचारिक भेट फार काही चांगली नव्हती. पामेला यांनी सांगितल्यानुसार, दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांना एकांत दिला खरा. पण या संपूर्ण भेटीत यश शांत होते. या भेटीनंतर दोघांनाही कुटुंबीयांनी विचारलं असता, दोघांनीही लग्नास नकार दिला होता. मला यश फार काही आवडले नाहीत, असं पामेला यांचं उत्तर होतं. तर घंटी नहीं बजी, हे यशजींचं उत्तर होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असावं.
यश यांची फ्लाईट मिस झाल्यामुळे पामेला व यश यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. ही भेट मात्र यशस्वी राहिली. या भेटीत यश यांचा एक वेगळाच चेहरा पामेला यांना बघायला मिळाला. यश लुंगी व कुर्ता घालून जमिनीवर बसून ढोल वाजवत मस्तपैकी गात होते. यशजींवर पामेला भाळल्या आणि याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं.
यश आणि पामेला यांनी सुखी संसार केला. यशजींचा सिनेमांचा चढउतार काळ या पामेला यांनी पाहिलाय. या सर्व काळात पामेला पत्नी म्हणून यश चोप्रांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.