बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाइफमुळे प्रचंड चर्चेत येत आहेत. नुसरत यांनी अलिकडेच एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून या बाळाच्या वडिलांवरुन नेटकऱ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. यामध्येच नुसरत यांच्या बाळाचं बर्थ सर्टिफिकेट समोर आलं आणि या बाळाच्या वडिलांविषयी असलेलं कोडं उलगडलं. या सर्टिफिकेटनुसार, अभिनेता यश दासगुप्ता (Yash Dasgupta) नुसरत जहाँच्या बाळाचे वडील असल्याचं समोर आलं आहे. परंतु, हे कोड उलगडल्यानंतरही अनेकांनी नुसरत यांना पुन्हा ट्रोल केलं. विशेष म्हणजे सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगवर नुसरत यांनी मौन सोडलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ट्रोलर्सला थेट शब्दांत सुनावलं आहे. इतकंच नाही तर यश दासगुप्तानेही यावेळी त्याचा संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बाळाविषयी आणि एकमेकांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच 'लोकं काय म्हणतात याची मला पर्वा नाही', असं नुसरत जहाँ यांनी सांगितलं.
"मला त्यावेळी अजिबात भीती वाटत नव्हती. हा आमचा वैयक्तिक निर्णय होता. लोकं काय बोलतील याची मला पर्वा नव्हती. एक खात्री होती, एक तर लोकं मला स्ट्राँग बोलतील किंवा माझ्यावर टीका करतील", असं नुसरत म्हणाली.
बाळाचे वडील कोण? प्रश्न विचारणाऱ्यांना नुसरत जहाँ यांनी दिलं सडेतोड उत्तर
"बाळाला जन्म देण्यामागे आमची काही कारणं असू शकतात. मला एक सांगा जी लोकं आमच्याबद्दल चर्चा करतात त्यांना आमच्याकडून नेमकी कशाची अपेक्षा आहे. मी एका प्रेग्नंट स्त्रीला वाऱ्यावर सोडून देऊ? लोकांच्या नजरेत हे योग्य आहे का ?", असं यश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यावेळी नुसरतने मला प्रेग्नंसीबद्दल सांगितलं त्यावेळी तू या सगळ्यासाठी तयार आहेस का असं मी तिला विचारलं. कारण, ते तिचं शरीर आहे. त्यामुळे तिने तो निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा होती. तसंच तिचा जो काही निर्णय असेल मी तिच्यासोबत असेन असं आश्वासनही तिला दिला होतं. मला बाळ हवं होतं. पण, माझे विचार मला तिच्यावर लादायचे नव्हते.विशेष म्हणजे जर तुला हे बाळ नको असेल तरी चालेल मी माझ्या बाळाचा सांभाळ करेन असंही नुसरतने मला सांगितलं होतं."
दरम्यान, यश दासगुप्ता आणि नुसरत जहाँ या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. नुसरतने २६ ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला. यश दासगुप्ताला डेट करण्यापूर्वी नुसरतने निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही.