यशराज फिल्म्सचा आगामी पठाण सिनेमा येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. पठाणमधून शाहरुख खान (Shahrukh Khan) 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा वाद पाहता पठाणला तसा फायदाच झाला आहे. रिलीज आधीच सिनेमाचे ओटीटी राईट्स 100 कोटींना विकले गेले आहेत.
'पठाण'चे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाले आणि वाद पेटला होता. गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने काही संघटनांनी सिनेमाला विरोध केला होता. हा वाद एवढा वाढला की सेन्सॉर बोर्डानेही मेकर्सला बदल करण्यास सांगितले. आता पठाण 25 जानेवारी रोजी रिलीज होण्यास सज्ज आहे. सिनेमाच्या ट्रेलरला आतापर्यंत उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुख खान याने प्रतिक्रिया दिली आहे.
यशराज फिल्म्सने 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे. शाहरुख म्हणतो, 'मी 32 वर्षांपूर्वी अॅक्शन हिरो बनण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत आलो, पण मी बनू शकलो नाही, कारण त्यांनी मला रोमँटिक हिरो बनवले. मला फक्त अॅक्शन हिरो व्हायचं होतं. मात्र पठाण चित्रपटाद्वारे ते पूर्ण झाल्याचे शाहरुखने सांगितले.
'पठाण' चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना शाहरुख म्हणाले की, 'पठाण एक साधा मुलगा आहे. तो खूप कठीण गोष्टी करतो. मला वाटतं तो खोडकर आहे. पण तो दाखवत नाही. तो विश्वासार्ह आहे. तो प्रामाणिक आहे. तसेच मला वाटते की, तो भारताला मातेच्या रुपात पाहतो, असं शाहरुख खानने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अद्याप भारतात चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहता हा चित्रपट विदेशी बॉक्स ऑफिसवर शाहरूखचा सिनेमा छप्परफाड कमाई करणार, असं दिसतंय. रिपोर्टनुसार, UAE मध्ये आतापर्यंत 65 हजार डॉलर्स म्हणजेच 52 लाखांवर रुपयांची 4500 तिकिटे विकली गेली आहेत. शाहरूखच्या रईसने UAE मध्ये पहिल्या दिवशी साडेतीन मिलियन डॉलर्स (सुमारे 2.84 कोटी रुपये) कमावले होते. 'पठाण' रिलीज व्हायला आणखी 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा चित्रपट रईसला मागे टाकणार, असं वाटतंय.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ॲडव्हान्स बुकिंग-
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही 'पठाण'चं जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. अमेरिकेत दोन कोटींवर किमतीची 22 हजार 500 तिकिटे विकली गेली आहेत. जर्मनीत पहिल्याच दिवशी 4500 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. लोकांनी रिलीजपूर्वी वीकेंडसाठी 9000 तिकिटे खरेदी केली आहेत. आत्तापर्यंत जर्मनीत पठाणने 1.32 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"