मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.“दुष्कृत्य केल्यानंतर देवतांचे राजे इंद्रदेखील स्वर्गातून खाली पडतात. मग तो तर केवळ एक नेता आहे. त्यानं अन्यायानं माझं घर तोडलं, तेव्हाच समजलं होतं की हाही लवकरच पडणार. चांगलं काम करुन देवता परत वर जाऊ शकतात. पण स्त्रीचा अपमान करणारे कधीच वर उठू शकत नाहीत. तो परत कधीच उठू शकणार नाही,” असा एकेरी उल्लेख करत कंगनानं उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
एकनाथ शिंदेंचाही निशाणानिवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून, यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या, असा सल्ला दिला आहे. आम्ही ५० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक व लाखो शिवसैनिक चोर आणि तुम्ही एकटे साव, असं विचारत कधी तरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणार की नाही, असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना केला.
धनुष्यबाण सोडविलाउद्धव ठाकरेंनी २०१९ला हा धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आज आम्ही सोडविला आहे. आता त्यांचा सहानुभूती मिळण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये, म्हणून केलेला हा प्रयत्न आहे, असंही शिंदे म्हणाले.