- सुवर्णा जैनवेगळ्या वाटेने जाण्यासाठी आणि सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी हिंमत लागते. विशेष म्हणजे आपल्या हातातलं सगळे सोडून सगळे नव्याने निर्माण करणे हे कठीण असते. मात्र जिद्द आणि मेहनतीची तयारी असली की अशक्य ते शक्य होते हे एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या पतीच्या मदतीने सिद्ध केले आहे. शेती आणि ग्रामीण भाग ही मध्यवर्ती संकल्पना राबत कृषी पर्यटनाचा नवा पॅटर्न त्यांनी शोधून काढला आहे. रत्नागिरीतील फुणगूसमधील त्यांच्या या पॅटर्नचे नाव आहे आनंदाचे शेत. अभिनेत्री-निवेदिका-लेखिका असं अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेल्या संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने आपला पती राहुलच्या मदतीने अशक्य ते शक्य करुन दाखवत सा-यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अभिनयामुळे घराघरात पोहचलेली संपदाचे हात आज लाल मातीत माखले आहेत. तिचा पती राहुल गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कोकणच्या लाल मातीत राबतो आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून आनंदाचे शेत हा प्रयोग प्रचंड यशस्वी होताना पाहायला मिळतो आहे. याच निमित्ताने संपदाकडून आनंदाचे शेत या आगळ्यावेगळ्या अनोख्या प्रयोगाविषयी जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न‘आनंदाचे शेत’ ही काय संकल्पना आहे आणि कशी सुचली ही कल्पना ?माझं आणि माझा पती राहुलचं एक स्वप्न होतं की चाळीशीनंतर आपण आपलं क्षेत्र बदलायचे. राहुल हा जाहिरात कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड होता. ते काम सोडत त्याने गावाकडे येण्याचे ठरवले. आम्हां दोघांसाठीही नोकरी सोडून शेतीकडे वळणे कठीणच होतं. मात्र सगळ्यात महत्त्वाचे असते तुमच्या जोडीदाराची साथ. राहुल सोमवार ते शुक्रवार आॅफिसला जायचा आणि शनिवार-रविवारी फुणगूसला यायचा. दोघांनीही ध्येय म्हणून ठरवले की करायचे तर करायचंच. राहुलची वडिलोपार्जित जमीन होती. सध्या आम्ही शेती करत असलेल्या ठिकाणी फक्त डोंगर होता. त्यावेळी दोघांनीही शेतात घाम गाळला. नांगर फिरवला आणि उत्पादन सुरु झाले. आंबा, काजू अशी विविध फळे आमच्या शेतात उगवू लागली. कोकणी पद्धतीने एक घर बांधले. कुटुंबाला राहता येईल अशी या घराची रचना केली. विशेष म्हणजे आम्ही सेंद्रिय खताचा वापर करत शेती करतो.आमच्या शेतातील भाजी, फळे थेट मुंबईपर्यंत पोहचली आहेत. उराशी स्वप्न बाळगले होते की शेतीचे महत्त्व आणि निसगार्चे सौंदर्य लोकांपर्यंत पोहचवायचे ते करण्यात यश येत आहे. तरीही एक नवा व्यवसाय उभा राहिला आहे. लोकांची त्याला साथ मिळाली. सुखाने जगण्याचा नवा मार्ग शोधला असून त्याला लोकांचाही उदंड प्रतिसाद लाभतो आहे. १६ जानेवारीला या सगळ्या संकल्पनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंदाचे शेत नावारुपाला येत आहे हे पाहून अतिशय आनंद होत आहे.‘आनंदाचे शेत’मध्ये आल्यानंतर इथे काय काय पाहायला मिळते ? डिजीटल युगात मुलं जेव्हा आनंदाचे शेतला भेट देतात तेव्हा मोबाईलपासून दूर नेत त्यांना बैलगाडीची सफर आम्ही घडवत सगळ्या गोष्टींची माहिती देतो. आमराईत घर, घरातल्या भाज्या जेवणातल्या ताटात, चुलीवरील जेवण कुणालाही आपल्या गावची आठवण करुन देईल.कोकणातल्या विविध भागातील पाककृती इथे जेवणात असतात. याशिवाय मुलांना आम्ही जेवणातल्या ताटातील तांदुळ कुठून येतो इथपासून माहिती देतो. १ तांदुळ पेरला की २०० तांदुळ होतात. एक तीळ पेरला की दोन हजार तिळ येतात अशी माहिती मुलं आणि पालक दोघांनाही देतो. माज्या सास-यांचं स्वप्न होतं की गावात जायचे. आमच्या या उपक्रमामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे.‘आनंदाचे शेत’ कृषी पर्यटनाचा नवा पॅटर्न म्हणून नावारुपाला येत आहे याचा किती आनंद आहे ? ऐशोआरामात जगण्याचं किंवा राहण्याचं आपलंही स्वप्न असते. मात्र त्यातूनच स्पर्धा निर्माण होते. आनंदाचे शेत करताना आम्हाला कोणतीही स्पर्धा करायची नव्हती. मुळात आम्ही गावातल्या लोकांनाही रोजगार मिळवून दिला आहे. आमचा माल परदेशी पाठवणे हा उद्देश नाही. त्याला कमर्शियल रुप द्यायचे नाही. पोटासाठी, गावासाठी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील फुणगूसमध्ये शेती करत आहोत. महाराष्ट्रच नाही तर जगभरातील लोक आनंदाचे शेतला भेट देतात. फ्रान्स, जर्मनी अशा विविध भागातील पर्यटन इथे येऊन आनंदाचे शेत अनुभवतात. आमच्या या प्रकल्पाची आम्ही कुठेही जाहिरात केलेली नाही. याशिवाय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून आयआयपीटी इंटरनॅशनल पीस टुरिझम अवॉर्डही मिळाला आहे. २२आऊटलूक ग्रुप आॅफ कंपनीकडून रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्डचा भारतात पहिला अवॉर्ड आम्हाला मिळाला आहे. हे सारं पाहून अनुभवून केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्यासारखं वाटते.‘आनंदाचे शेत’ने काय शिकवले ?माझी मुलगी लहान असताना सतत विचारायची की बाबा गावाला जातो. हे शेतीचे काम करतो. आता मुलगी २० वषार्ची झाली आहे. आज आनंदाचे शेत पाहून तिलासुद्धा अभिमान वाटतो. तिची काही स्वप्न पूर्ण करायला आम्हाला वेळ लागला असेल. दहावीचा रिझल्ट आल्यानंतर तिला मोबाईल दिला. दोन गोष्टी तिला उशिराने मिळाल्या असतील.मात्र आम्हाला आमच्या शेतीने आज या स्पर्धात्मक जगात थांबायला शिकवले आहे.
येवा कोकणात ‘आनंदाचे शेत’ असा!
By admin | Published: February 08, 2017 3:43 AM