60 आणि 70 च्या दशकात एक हिरोईन फिल्म इंडस्ट्रीत एका मोठ्या संधीच्या शोधात होती. पण कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता. पण काळ बदलला आणि पुढे याच हिरोईनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ लागली. ही हिरोईन कोण तर मुमताज. आपल्या मनमोहक हास्याने आणि सौंदर्याने खिळवून ठेवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री मुमताज (Mumtaz) दीर्घकाळापासून सिनेसृष्टीतून गायब आहेत. विदेशात आपल्या कुटुंबासोबत अलिप्त आयुष्य जगत आहेत. अलीकडे मुमताज यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.मुमताज यांची मुलगी तान्या हिने एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून चाहत्यांना अभिनेत्रीशी बोलण्याची संधी दिली. यावेळी मुमताज यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत.
बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करणार का? असा सवाल एका चाहत्याने केला. यावर, बॉलिवूड? मला ठाऊक नाही. माझ्या मनासारख्या भूमिका आत्ता मला मिळतील की नाही, याबद्दल मला खात्री वाटत नाही. पण मला पुन्हा काम करायला आवडेल. अर्थात त्यासाठी मला माझ्या पतीची परवानगी घ्यावी लागेल. त्यांनी हो म्हटलं तरच मी परतणार, असं उत्तर त्यांनी दिलं.
मी जाईल तेव्हा रडू नका...मी लवकरच मुंबईत येतेय, असं मुमताज यांनी यावेळी सांगितलं. हे ऐकून लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित असलेली त्यांची मुलगी तान्या हिने वेगळीच प्रतिक्रिया दिली. ही मुंबईला येईल तेव्हा हिला घराबाहेर निघायला सांगा, ही घराबाहे पाऊल ठेवत नाही, असं तान्या चाहत्यांना उद्देशून म्हणाली. यावर, ‘मी बाहेर पडले तरी कुणी मला ओळखणार नाही,’ असं मुमताज म्हणाल्या. लाईव्ह सेशनदरम्यान तान्याने मुमताज यांनी चाहत्यांचे काही संदेश वाचून दाखवले. ते ऐकून मुमताज काही क्षण भावुक झाल्यात.शेवटी मुमताज यांनी चाहत्यांचे आभार मानले. मी जिवंत आहे, तोपर्यंत माझ्यावर असंच प्रेम करत रहा. मी गेल्यावर माझ्यासाठी रडू नका, असं मुमताज म्हणाल्या.
लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या मुमताज यांनी त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. त्यांची आई नाज आणि मावशी निलोफर देखील आभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. परंतू त्या जूनियर कलाकार म्हणून काम करत होत्या. 60 च्या दशकात मुमताज छोट-छोट्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीस आल्या. त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले ते अभिनेता दारा सिंग यांच्या सोबत भूमिका साकारल्यानंतर. दोघांनी एकत्र एकापाठोपाठ चक्क16 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांपैकी 10 चित्रपट चांगलेच गाजले. त्यानंतर मुमताज यांचे नाव यशाच्या उच्च शिखरावर पोहचले. दारा सिंगनंतर त्यांना साथ मिळाली ती अभिनेता राजेश खन्ना यांची. हा काळ त्यांच्यासाठी सोनेरी काळ होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 'दो दोस्त', 'सच्चा-झुठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'रोटी' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मुमताज-राजेश चाहत्यांच्या भेटीस आले.