मुंबई - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये तिने महिला वैमानिकाची भूमिका साकारली आहे. सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. खराब स्टोरी, दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान कंगनाने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची विनंती केली आहे. मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट मंत्र्यांसह कंगनाचा तेजस चित्रपट पाहिला. यावेळी, मुख्यमंत्री योगी भावूक झाले होते.
लखनौच्या लोकभवन येथे कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग झाले. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी व त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी या विशेष स्क्रिनींगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अभिनेत्री कंगना रणौतनेही त्यांच्यासमवेत चित्रपट पाहिला. भारतीय वायूसेनेची पायलट तेजस हिच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. दरम्यान, चित्रपट पाहताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय सैन्याची कथा पाहून भावुक झाले होते.
कंगना रणौतने ट्विटवरुन यासंदर्भात माहिती देताना योगी आदित्यनाथ चित्रपट पाहताना भावुक झाल्याची माहिती दिली. “महाराज जी हमारे सैनिकों का साहस, शौर्य और बलिदान देख कर इतने भावुक हो गये की उनकी आँखें छलक आई, धन्यवाद महाराज जी.”, असे ट्विट कंगनाने केले आहे.
चित्रपट गर्दी खेचण्यात कमी, कंगनाचे आवाहन
'मित्रांनो माझा सिनेमा तेजस रिलीज झाला आहे. ज्यांनी सिनेमा बघितला ते कौतुक करत आहेत, आशिर्वाद देत आहेत. पण मित्रांनो कोरोनानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्री अद्याप सावरलेली नाही. ९९ टक्के सिनेमांना प्रेक्षक संधी देत नाहीत. मला माहित आहे की आजकाल सगळ्यांकडे मोबाईल फोन आणि घरात टीव्ही आहेत. पण, तुम्ही सिनेमागृहात जाऊन कुटुंब, मित्रमंडळींसोबत सिनेमाचा आनंद घ्या. जर तुम्हाला उरी, मेरी कोम, नीरजा हे चित्रपट आवडले तर तेजसही नक्कीच आवडेल.'