मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. किरण माने आणि दिग्गज दिवंगत अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांच्यात खास नात होतं. किरण मानेंवर निळू भाऊंचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांच्यासाठी ते आदर्श आहेत. आज निळू फुले यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने किरण माने यांनी निळू भाऊंबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी वर्तवलेल्या भाकिताविषयी पोस्ट शेअर केली आहे.
निळू फुले बऱ्याचदा किरण मानेंना भेटायला त्यांच्या घरी जात असतं. दोघांचे अनेक विषयावर चर्चा व्हायची. या काळात निळू भाऊंनी किरण मानेंना अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातल्या काही गोष्टी आज खऱ्या देखील झाल्या आहेत. किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ..निळूभाऊ कधीबी अचानक माझ्या सातारच्या घरी यायचे ! मी लहान नट. पन लै आरामात गप्पा मारायचे माझ्याशी. आपल्या मोठेपनाचं समोरच्यावर कुठलंबी दडपन येऊ न देनारा दिलखुलास मानूस. पं. सत्यदेव दूबेजींच्या वर्कशाॅपनंतर पुण्यात माझा एक कवितावाचनाचा कार्यक्रम झाला. तो बघायला निळूभाऊ आलेवते. तवापास्नं का कुनास ठावूक? भाऊ कायम माझ्या संपर्कात राहीले. लै भारी गप्पा व्हायच्या. पन ते सातारला माझ्याकडं आले किंवा मी पुण्यातल्या त्यांच्या घरी गेलो काही क्षण मी भारावल्यासारखा असायचो. मला खरंच वाटायचं नाय, साक्षात निळू फुले माझ्याशी बोलत्यात ! माझं मन लै लै लै मागं जायचं... मायनीतल्या 'गरवारे टुरींग टाॅकीज'च्या तंबूत...
त्यांनी पुढे सांगितले की, १९८० नंतरचा काळ... तंबू थेटरमध्ये 'शनिमा' बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी !...कारन पडद्यावर 'कर्रकर्रकर्र' असा कोल्हापूरी चपलांचा आवाज करत 'त्यानं' एन्ट्री घेतलेली असायची.. बेरकी भेदक नजर - चालन्याबोलन्यात निव्वळ 'माज' - नीच हसनं... शेजारी बसलेल्या माझ्या गांवातल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या.. सगळीकडनं आवाज यायचा : "आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय." ...थेटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा "बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वोS" आग्ग्गाय्य्यायाया...अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची...१९९० नंतरचा काळ...काॅलेजला मायणीवरनं सातारला आलेला मी. अभिनयाकडं जरा सिरीयसली बघायला सुरूवात झालेली... जुन्या क्लासिक मराठी-हिंदी-इंग्रजी फिल्मस् पाहून अभिनयवेड्या मित्रांशी तासन्तास चर्चा - 'अभ्यास'... अशात एक दिवस 'सिंहासन' बघितला ! त्यात निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार दिगू टिपणीस पाहून येडा झालो !! 'सामना' मधला हिंदूराव पाटील... 'पिंजरा' मधला परीस्थितीनं लोचट-लाचार बनवलेला तमासगीर..'एक होता विदूषक' मधला सोंगाड्याच्या भूमिकेचं मर्म सांगणारा लोककलावंत.. आईशप्पथ ! केवढी अफाट रेंज ! 'सखाराम बाईंडर' नाटक वाचल्यानंतर भाऊंनी सखाराम कसा साकारला असेल ते इमॅजीन करायचो कायम. अजूनबी करतो. पुढं ते जेव्हा कधी भेटले, तेव्हा मी मुद्दाम बाईंडरचा विषय काढायचो आणि 'जीवाचा कान' करून त्यांना ऐकायचो, असं किरण मानेंनी सांगितले.
जो काही छोटासा सहवास लाभला त्यात या महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं.. आपली मराठी इंडस्ट्री कशी आहे.. मला पुढं जाऊन काय त्रास होऊ शकतो.. याचं भाकित भाऊंनी त्यावेळी केलं होतं ! मी तरीबी हार न मानता, या त्रासाला कसं उत्तर देत संघर्ष करायची गरजय, याचा कानमंत्रबी दिला होता. त्याचा आज लै लै लै उपयोग होतोय. परीपूर्ण 'नट' कसा असावा? असा प्रश्न कुनी विचारल्यावर माझ्या डोळ्यापुढं मराठीतलं एकमेव नांव येतं - निळू फुले ! नटानं आपल्या भवताली घडणार्या छोट्यामोठ्या घटना, राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, साहित्य सगळ्या-सगळ्या गोष्टींबद्दल भान ठेवायला पायजे हे निळूभाऊंकडनं शिकलो. सशक्त नट घडतो तो भवतालाच्या वाचनातूनच. मी प्रत्यक्ष भेटल्यावर 'मानूस' म्हनून भाऊंच्या जास्त प्रेमात पडलो, असे किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.त्यांनी पुढे लिहिले की, भाऊ, आज १३ जुलै. तुम्हाला जाऊन तेरा वर्ष झाली. पुणे-सातारा हायवेवर वेळेजवळ अजून तुमचा फोटो असलेलं होर्डींग झळकत असतं...त्यावर लिहीलंय : 'मोठा माणूस' !