बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आणि चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेता म्हणून ओळख असलेले राजेश खन्ना यांचा आज 6वा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया. राजेश खन्ना यांच्या सिनेमांबाबत, त्यांच्या अभिनयाबाबत आजही भरभरून बोललं जातं. पण अनेकांना त्यांचं खरं काय आहे हेच माहीत नाहीये. सिनेमात काम सुरू करताना अनेकांनी आपलं खरं नाव पडद्यामागेच ठेवलं. तसंच आपलं खरं नाव राजेश खन्ना यांनीही वापरलं नाही.
पंजाबच्या अमृतसरमध्ये 29 डिसेंबर १९४२ मध्ये राजेश खन्ना यांचा जन्म झाला होता. लहान पणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत शिकत असताना त्यांनी अनेक नाटकांमधून काम केले होते. परंतु त्यांच्या वडिलांना त्यांना असलेली अभिनयाची गोडी मान्य नव्हती.
राजेश खन्ना यांचं खरं नाव जतिन खन्ना असं होतं. त्यांच्या काकांच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदलून राजेश ठेवलं होतं. जम्पिंग जॅक ऑफ बॉलिवूड अशी ख्याती असलेले जितेंद्र आणि राजेश खन्ना यांनी एकत्रच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जितेंद्र यांच्या पहिल्या चित्रपटाच्या ऑडिशनवेळी कॅमेरासमोर बोलायला राजेश खन्ना यांनी शिकवले होते. तेव्हापासून जितेंद्र आणि त्यांची पत्नी राजेश खन्ना यांना 'काका' म्हणून हाक मारत असत. त्यानंतर चाहत्यांमध्येही त्यांचं काका या नावाने प्रसिद्ध झालं.
राजेश खन्ना यांनी आपल्या बॉलिवूडमधील करियरची सुरुवात 1966मध्ये वयाच्या 23व्या वर्षी दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या 'आखिरी खत' या चित्रपटातून केली. राजेश आणि टीना मुनीम यांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप गाजली होती. त्यानंतर दोघांनी 'फिफ्टी-फिफ्टी' (1981), 'सुराग' (1982), 'सौतन' (1983), 'अलग-अलग' (1985), 'आखिर क्यों' (1985), 'अधिकार' (1986) यांसारख्या अनेक चित्रपटांतून काम केलं. राजेश खन्ना आणि टीना यांचं अफेअर असल्याच्याही अनेक चर्चा त्याकाळात होत होत्या. तसेच डिंपल कपाडीयाला घटस्फोट देवून आपल्याशी लग्न करावं असा प्रस्ताव टीनाने राजेश खन्ना यांच्यासमोर ठेवल्याच्या चर्चा होत्या.