Join us

"तुझ्यामुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले", जागतिक टेलिव्हिजन डे निमित्ताने मेघा धाडेनं लिहिलं भावुक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:32 IST

Megha Dhade : २१ नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हिजन डे साजरा केला जातो आणि या निमित्ताने 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत भैरवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने एक अनोख्या पद्धतीने टेलिव्हिजनचे आभार व्यक्त केले.

२१ नोव्हेंबरला जागतिक टेलिव्हिजन डे साजरा केला जातो आणि या निमित्ताने 'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Sawali)मालिकेत भैरवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हिने एक अनोख्या पद्धतीने टेलिव्हिजनचे आभार व्यक्त केले. 

 मेघा धाडेने जागतिक टेलिव्हिजन डेच्या निमित्ताने टेलिव्हिजनचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिले आहे. तिने लिहिले की, प्रिय टीव्ही, नमस्कार! मी मेघा धाडे , तुझी  एक छोटीशी चाहती आणि सखी . तू माझ्या घरातली एक वस्तू नाही तर एक खास आणि महत्वाचा सदस्य आहेस. आज मी माझ्या मनातील तुझ्या विषयीच्या भावना व्यक्त करताना तुला एक पत्र लिहित आहे. आपल्याला असं कधी बोलताच आलं नाही कारण तू नेहमी माझं किंवा माझ्या घरातल्यांचा मनोरंजन करण्यासाठी आपलं जीव व्यतीत करत आला आहेस. 

तो आनंद वेगळाच होता...तिने पुढे लिहिले की, तुझ्यामुळे मला अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत.  माझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात उपस्थित राहिलास तू. तुझ्यामुळे मी घराघरात पोहचले, लहानपणी जिच्याजवळ एक कुटुंब होतं आज तेच कुटुंब शेकडो -करोडो लोकांचं झालय. एका सामान्य कुटुंबातून आलेली मेघा आज तुझ्या साथीने सर्वांची लाडकी झाली.  प्रेक्षकांचं प्रेम आणि समाजामध्ये सन्मान मिळत आहे. त्याच्यासाठी मी तुझी ऋणी आहे. आजही तुझ्यासाथीने इतक्या वर्षानंतर जेव्हा मालिकांमध्ये परतायचं ठरवले तेव्हा 'सावळ्याची जणू  सावली' सारखी उत्कृष्ट मालिकेद्वारे तू मला पुन्हा घरोघरी पोचवलंस. तुझ्या माध्यमातून मी अनेक कथा पाहिल्या, विविध पात्रांमध्ये रंगले आणि त्या पात्रांच्या आनंदात, दु:खात, संघर्षात सहभागी झाले. एक अभिनेत्री म्हणून जेव्हा मी स्वतःला  टेलिव्हिजन स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिलं  होतं तो आनंद वेगळाच होता.   माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे...तुझ्या  स्क्रीनवर जेव्हा मी उत्कृष्ट अभिनय, मालिका, चित्रपट बघते  तेव्हा त्यातल्या कलाकारांची, अभिनयाची,  प्रशंसा अनेकदा केली आहे पण  तुझ्याबद्दल क्वचितच कधी कौतुक केलं असावं. तुझ्या माध्यमातून मला प्रेक्षकांच्या प्रेमाची अनुभूती मिळते. कधी एकटेपणातही तुझीच साथ असते. तू  घरात असताना, प्रत्येक क्षण खास असतो. आपण दोघांनी सोबत अनेक आठवणी तयार केल्या आहेत. तुला धन्यवाद देण्यासाठी शब्द कमी पडतील कदाचित, पण तुझ्या  उपस्थितीमुळे माझे जीवन अधिक रंगीत झाले आहे. तुझी सखी, मेघा धाडे. असे तिने म्हटले आहे.

टॅग्स :मेघा धाडे