प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्यात सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरू आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना खरीखोटी सुनावताना दिसत आहेत आणि यामागचे कारण आहे नेहा कक्करचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं 'ओ सजना'. हे गाणं फाल्गुनी पाठक यांच्या नव्वदीच्या दशकातल्या ‘मैने पायल है छनकाई’ या सुपरहिट गाण्याचं रिमिक्स आहे. या गाण्यामुळे नेहा फार ट्रोल होत आहे. त्यात या गाण्यावर फाल्गुनी पाठक यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर नेहा आणि फाल्गुनी पाठक यांच्यात शाब्दिक द्वंद्व सुरू झाले होते. पण आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हाला अंदाज येईल की ही भांडणं निव्वळ ड्रामा असण्याची शक्यता आहे.
नुकताच 'इंडियन आयडॉल' कडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे ज्यात फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर एकत्र दिसत आहेत आणि त्यांची केमिस्ट्री पाहता त्यांच्यात काही वाद आहे, असे वाटत नाही. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नेहा कक्करने फाल्गुनी पाठकची ओळख करून दिली. एवढेच नाही तर नेहाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर डान्सही केला. नेहा कक्करचा हा लूक पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले, काही लोक असेही म्हणत आहेत की हे सर्व फक्त त्यांचे गाणे सुपरहिट बनवण्याची रणनीती होती.
'इंडियन आयडॉल १३'मध्ये जजच्या खुर्चीवर बसलेल्या नेहा कक्करने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. ती फाल्गुनीसोबत स्टेजवर डान्स करताना दिसली. बाहेर मतभेद असतानाही शोमध्ये सलोख्याने वागत दोघींनीही त्या प्रोफेशनल असल्याचे दाखवून दिले आहे. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच जणांनी दोघींची स्तुती केली. तर काहीजणांनी त्यांना ट्रोल केले आहे. एकाने या व्हिडीओखाली ‘फाल्गुनीजी तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करत होतात’, अशी कमेंट केलीय. दुसऱ्या यूजरने ‘गाण्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून हे लोक काय करतील याला अंत नाही. आधी दोघी भांडल्या आता टिव्हीवर एकत्र काम करत आहेत’ असे म्हटले आहे.