मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी आजही त्यांचे चित्रपट लोक आवडीने पाहतात. असाच त्यांचा एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे एक गाडी बाकी अनाडी. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता अरूण यांचे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्यासोबत खूप जवळचे नाते आहे. या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे लग्नाआधीचे नाव प्रिया अरुण कर्नाटकी. प्रियाचे वडील अरुण कर्नाटकी हे त्यावेळचे प्रसिद्ध निर्माते आणि छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांचे पुत्र. धोंडी धोंडी पाणी दे, चावट, लपवाछपवी, तिखट मिरची घाटावरची, बंदिवान, पाठलाग या एकामागून एक अशा हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चित्रपट बनवण्याचे धाडस केले होते आणि हे चित्रपटदेखील सुपरहिट ठरले. पुढे कर्नाटकी यांनी अभिनेत्री लता काळे यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्या लता अरुण या नावाने ओळखू लागल्या.
लता अरुण या मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९५८ साली १० लाखाचा धनी या नाटकात पद्मा चव्हाण, शालिनी नाईक यांच्यासोबत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. तर नटसम्राट हे गाजलेले नाटक त्यांनी रंगभूमीवर पुन्हा नव्याने साकारले. अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या जय रेणुकादेवी यल्लमा चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमात आपली छाप उमटविली होती. एवढया नामवंत घरात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्यावर आपले स्थान निर्माण केले.