Join us  

तरूणांनी सनी लिओनीमुळे प्रभावित होऊ नये - प्रसून जोशी

By admin | Published: January 27, 2016 3:08 PM

आजच्या तरूण पिढीने सनी लिओनीमुळे प्रभावित होऊ नये असे प्रख्यात गीतकार प्रसून जोशीने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - एकेकाळी पॉर्न इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येऊन चार वर्ष उलटून गेल्यानंतरही तिची जुनी ओळख काही पुसली जात नाही. गेल्या आठवड्यातच एका इंटरव्ह्यूमुळे पुन्हा चर्चेत आलेल्या सनीला बॉलिवूडकरांनी खुलेपणाने तिच्या पाठिशी उभे राहिले. मि. परफेक्शनिस्ट आमिर खाननेही तिला पाठिंबा देत तिच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली. मात्र असे असले तरीही बॉलिवूडमधील सर्वांनीच तिला अद्याप स्वीकारलेले नाही. प्रख्यात गीतकार आणि स्क्रीनरायटर प्रसून जोशीही त्यापैकी एक असून आपल्याला कोणाचाही अवमान करायची सवय नसली तरी आपल्याला सनीचा भूतकाळ, तिचे काम मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'रंग दे बसंती' या चित्रपटाला चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ' सनी लिओनीचा भूतकाळ मला मान्य नाही आणि आजच्या तरूण पिढीने तिच्यामुळे प्रभावित व्हावे, असेही मला वाटत नाही', असे प्रसूनने म्हटले.
' जर एखादी व्यक्ती ड्रग डीलर असेल तर तो त्या व्यक्तीचा स्वत:चा निर्णय असतो. मग म्हणून मी त्या व्यक्तीचा द्वेष अथवा अपमान करणार नाही, ते माझ्या संस्कृतीत बसतही नाही. पण म्हणून मी त्या व्यक्तीला किंवा तिच्या प्रोफेशनला प्रोत्साहनही देणार नाही. काही प्रोफेशन्स अशी असतात जी एका चांगल्या, महान समाजाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी नसतात. त्यामुळे त्या गोष्टींबाबत, कामाबाबत आपण टीका केलीच पाहिजे' असे प्रसून म्हणाले.
' आपण एका मोकळ्या, स्वतंत्र समाजात राहतो, जिथे प्रत्येकाला स्वत:चा मार्ग निवडण्याचा, निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी चोखाळलेली वाट जर योग्य नसेल तर आपण त्यावर टीका करणे आवश्यक आहे' असेही त्यांनी नमूद केले.