Join us

तुमचा अभिमान ! थलायवा रजनीकांतकडून "बाहुबली"चं कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2017 12:47 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटाचं कौतुक करत हा चित्रपट भारतीय सिनेमाचा अभिमान असल्याचे कौतुगाद्गार काढले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित "बाहुबली 2" चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरक्ष: भुरळ घातली आहे. थिएटरबाहेर लागलेल्या लांब रांगांपासून ते सोशल मीडियावर सगळीकडे फक्त बाहुबलीची चर्चा आहे. इतकंच कशाला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील यापासून लांब राहू शकले नाहीत. नुकतंच त्यांनी चित्रपटाचं कौतुक करत हा चित्रपट भारतीय सिनेमाचा अभिमान असल्याचे कौतुगाद्गार काढले आहेत. रजनीकांत यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
रजनीकांत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "बाहुबली 2 भारतीय सिनेमाचा अभिमान आहे. एस एस राजामौली आणि त्यांच्या टीमला माझा सलाम". खुद्द रजनीकांत यांनीच कौतुक केलं आहे म्हटल्यावर राजामौली यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लगेच ट्विटला उत्तर देत, "थलायवा.....देव स्वत: आम्हाला आशिर्वाद देत आहे असं वाटतं, यापेक्षा मोठं काही असू शकत नाही", असं म्हटलं आहे. 
सगळ्या रेकॉर्ड्सना अक्षरक्ष: पायदळी तुडवत बाहुबलीची वाटचाल सुरु आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणा-या चित्रपटाची लोकांना प्रचंड उत्सुकता होती. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर "बाहुबली 2" रिलीज झाला आहे. चित्रपटाची एवढी चर्चा होत असताना अपेक्षेवर खरा उतरेल की नाही याबाबत काहींनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र बाहुबलीने सर्वोत्कृष्ट सिद्ध होण्यामध्ये कोणतीच कसर सोडलेली नाही. चित्रपटाने फक्त दोन दिवसांत तब्बल 599 कोटींची कमाई केली आहे. 
 
चित्रपटाने पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. बाहुबलीने पहिल्याच दिवशी भारतात 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. आपली घोडदौड सुरु ठेवत दुस-या दिवशीही चित्रपटाने भारतात 285 कोटी तर जगभरात 382 कोटींची कमाई केली. येणा-या दिवसांमध्ये कमाईचे येणारे आकडे हा एक नवा उच्चांक असेल. 
 
देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधील मल्टिप्लेक्‍समध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग फुल्ल झाले असून, बाहुबलीने आमिर खानच्या "दंगल"लाही मागे टाकलं आहे.  बूक माय शोने दिलेल्या माहितीनुसार, दिवसात तिन्ही भाषांना मिळून बाहुबलीची किमान 10 लाख तिकिटं विकली गेली होती. 
 
"बाहुबली : द बिगिनिंग हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं ?, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.
 
आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट "बाहुबली 2" हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये आज रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाच्या तिकिटांची किंमतही वेगवेगळी आहे. दिल्लीत, या चित्रपटाचं किंमत 2400 वर येऊन पोहोचली आहे. तर अमेरिकेत या चित्रपटासाठी चाहत्यांना 40 डॉलर मोजावे लागणार आहेत. या सिनेमाच्या हिंदी भागाची सर्व हक्क करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
 
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.