मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, कॉलेजचे बेफिकिर आयुष्य हे सगळेच आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. प्रत्येकाच्या आठवणींमध्ये असलेला आणि म्हणूनच आपलासा वाटणारा हा काळ आम्ही बेफिकर या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होत आहे.
हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, 'आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा हा चित्रपट आहे. म्हणूनच चित्रपटाचा लुकही यूथफुल आहे. आजपर्यंत कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात 'आम्ही बेफिकर' नक्कीच वेगळा ठसा उमटवेल. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला 'आम्ही बेफिकर' हा चित्रपट पाहून प्रेक्षकही 'आम्ही बेफिकर' म्हणतील यात काहीच शंका नाही. प्रत्येकाला आपलासा वाटणारा 'आम्ही बेफिकर' २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.