पॉप सिंगर रिहानाने भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत ट्वीट केले आणि अख्खा देश ढवळून निघाला होता. रिहानाच्या ट्वीटनंतर भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. भारतात तर रिहानाच्या या ट्वीटची जोरदार चर्चा झाली होती. तू आमच्या अंतर्गत कारभारात नाक खूपसू नकोस, असे काय काय भारतातील अनेकांनी रिहानाला सुनावले होते. आता कॅनडाची लोकप्रिय युट्यूबर व अभिनेत्री लिली सिंह हिने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. अगदी ग्रॅमी अवार्डच्या व्यासपीठावर तिने शेतकरी आंदोलनाचा मुद्दा पोहोचवला आहे.होय, काल लॉस एंजेलिसमध्ये रंगलेल्या 63 व्या ग्रॅमी अवार्ड शोमध्ये लिली सिंह आगळावेगळा मास्क घालून पोहोचली. ‘I Stand with farmers’ असे या मास्कवर लिहिलेले होते. तिच्या या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लिलीने इन्स्टा अकाऊंटवर स्वत:चा ग्रॅमी अवार्डमधील फोटो शेअर केला. सोबत भारतात आंदोलन करत असलेल्या शेतक-यांसाठी एक पोस्टही लिहिली. ‘मला माहितीये, रेड कार्पेट आणि अवार्ड शोच्या फोटोंना नेहमी अधिक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे माध्यमांनो पाहा आणि मोकळेपणाने दाखवा,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले. सोबत #IStandWithFarmers #Grammys हे हॅशटॅगही पोस्ट केलेत. सध्या लिलीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतआहे.
काही दिवसांपूर्वी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले होते. आपण यावर बोलत का नाही? असा सवाल करत रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता. तिच्या ट्वीटनंतर भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला होत्या. कंगना राणौतने रिहानाला मूर्ख म्हणत तिच्यावर बोचरी टीका केली होती. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले होते. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले होते.