Join us

Zakir Hussain Love Story: कथ्थक डान्सरच्या प्रेमात पडले, आईचा विरोध पत्करुन केलं लग्न; अशी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:43 IST

झाकीर हुसेन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मुली कोण आणि काय करतात वाचा.

प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचं काल  अमेरिकेत निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतच नाही तर जगभरात त्यांनी आपलं नाव कमावलं होतं. त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं होतं. झाकिर यांच्या निधनाने कलासृष्टी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.

अशी होती झाकीर हुसेन यांची लव्हस्टोरी 

संगीत जगतातील महारथी उस्ताद अल्ला रक्खा यांचे पुत्र झाकीर हुसेन यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. तबला वादनातील पुढील शिक्षणासाठी ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे तबला शिकता शिकता त्यांची भेट इटालियन-अमेरिकन मुलगी एंटोनिया मिनेकोलाशी झाली. बघताच क्षणी ते तिच्या प्रेमात पडले. झाकीर हुसेन ज्या अकादमीत तबला वादनाचं शिक्षण घेत होते तिथेच एंटोनिया कथ्थक शिकत होती. सुरुवातीला एंटोनिया यांनी रिलेशनशिपसाठी नकार दिला होता. पण झाकीर हुसेन यांनी हार मानली नाही. ते रोज एंटोनियाच्या क्लासबाहेर तिची वाट बघायचे. शेवटी एंटोनियाने त्यांना एक संधी द्यायचं ठरवलं. बघता बघता त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं.

दोन्ही कुटुंबातून होता विरोध

झाकीर हुसेन आणि एंटोनिया यांच्या लग्नात अनेक अडथळे आले. एंटोनिया यांच्या वडिलांनी या नात्याला विरोध केला. एक तबला वादकाची अशी किती कमाई असेल अशी त्यांना शंका होती. मात्र झाकीर आणि एंटोनिया यांनी त्यांचं मन वळवलंच. एंटोनियाच्या वडिलांनी होकार दिला पण झाकीर यांची आई मात्र या लग्नाच्या विरोधातच होती. याउलट झाकीर यांचे वडील या लग्नामुळे खूप खूश होते. शेवटी झाकीर यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला न सांगताच दोघांचं लग्न लावून दिलं. ही गोष्ट नंतर झाकीर यांच्या आईला समजताच त्या खूप नाराज झाल्या होत्या. अनेक वर्ष सरल्यानंतर त्यांनी एंटोनियाला सून म्हणून स्वीकारलं.

झाकीर हुसेन आणि एंटोनिया यांना दोन मुली आहेत. इसाबेला कुरेशी आणि अनिसा कुरेशी अशी त्यांची नावं आहेत. ३९ वर्षीय अनिसा फिल्ममेकर आहे तर ३७ वर्षीय इसाबेला पाश्चिमात्य नृत्यात पारंगत आहे. दोघींची जन्म अमेरिकेतली सॅन फ्रान्सिस्कोमध्येच झाला. अनिसा कुरेशी ९ वर्षांची एक मुलगीही आहे. 

टॅग्स :झाकिर हुसैनदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टलग्नअमेरिकाभारतबॉलिवूड