बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने (Zareen Khan ) 'वीर' सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण तिला बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने (Salman Khan) बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. या चित्रपटात तिने एका राजकुमारीची भूमिका साकारली होती. 'वीर'मुळे जरीन रातोरात स्टार बनली. अभिनेत्री कतरिना कैफच्या चेहऱ्याशी साम्य असल्याने तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. मात्र, त्यानंतर तिचे करिअर काही बहरले नाही. तिने नुकतेच एका मुलाखतीत सलमानबाबत मोठा खुलासा केला आहे.
भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये जरीनने सलमानविषयी भाष्य केलं. जरीन म्हणाली की, ज्या अभिनेत्यांबरोबर मी काम केले आहे, त्यामध्ये मला सलमानची सर्वाधिक भीती वाटते. तेव्हाही आणि आताही त्याची भीती बाटते. मी सिनेमाच्या सेटवर नेहमीच सलमानला बघत असते. सलमान सोबत असताना नेहमी मला भीती वाटते. पण, तो इतका चांगला माणूस आहे की, त्याने मला कधीच भीती दाखवली नाही'.
पुढे ती म्हणाली, 'शूटिंगदरम्यान मी त्याच्या आसपास बसत असे. आराम करताना, तो त्याच्या क्रूसोबत व्हॅनिटीबाहेर बसायचा आणि मी सुद्धा त्यांच्यासोबतच तेथे बसायची. व्हॅनिटीबाहेर बसून मी सलमानलाच बघायचे, त्याचं निरीक्षण करायचे. सलमान त्याचे काम करायचा आणि मी त्याच्याकडे पाहत बसायचे. मध्येच तो मला विचारायचा 'काय झाले?' आणि मी म्हणायचे की 'मी तुझ्यासमोर बसले आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही'.
'वीर'मधून करिअरला सुरुवात केल्यानंतर जरीन खानने 'हाऊसफुल 2', 'हेट स्टोरी 3', 'वजाह तुम हो', 'अक्सर 2' आणि '1921' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सलमान खानबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या 'सिकंदर' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'सिकंदर'मध्ये सलमानसोबत रश्मिका मंदान्ना, सत्यराज आणि प्रतीक बब्बर दिसणार आहेत. हा चित्रपट 2025 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे