बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) म्हटलं की आठवतं ते जिया खान (Jiah Khan) आत्महत्या प्रकरण. जियाला आत्महत्या करण्यासाठी सूरजनेच प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता. प्रकरण कोर्टात गेलं होतं. सूरजला तुरुंगवासही भोगावा लागला होता. गेल्या वर्षी सूरजची आरोपातून मुक्तता झाली. या सर्व प्रकरणावर सूरजची आई म्हणजेच अभिनेत्री झरिना वहाब (Zarina Wahab) यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जिया खानबाबत अनेक खुलासे केले आहेत.
'लेहेरे रेट्रो'ला दिलेल्या मुलाखतीत झरिना वहाब म्हणाल्या, "जियाने याआधीही ४-५ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्या मुलावर सगळा आरोप आला कारण हा सगळा नशिबाचा खेळ होता. यामुळे त्याच्या करिअरवरही वाईट परिणाम झाला. मला तर हेट वाटतं की जर तुम्ही खोटं बोलून एखाद्याचं आयुष्य खराब करत आहात तर ते तुमच्या डोक्यावरचं कर्ज असेल असं समजा कारण तुम्हाला नंतर ते व्याजासकट भरावं लागतं."
त्या पुढे म्हणाल्या, "जिया काय करायची हे मला चांगलंच माहित आहे पण मला त्याविषयी बोलायचं नाही. त्याविषयी बोलून मी स्वत:ला खालच्या पातळीवर नेणार नाही."
जिया खानने २०१३ मध्ये राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी सूरज जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जियाच्या आईने सूरज आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले. यावरुन सूरजला अटक करण्यात आली मात्र नंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती.