बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा २००४ मध्ये 'मैं हूँ ना' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमात शाहरुखसह सुश्मिता सेन, अमृता राव आणि जायद खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे या सिनेमाच्या सेटवर असा एक किस्सा घडला होता ज्यावेळी रागाच्या भरात फराहने जायद खान याला चप्पल फेकून मारली होती.
'मैं हूँ ना' या सिनेमात जायेद खानने शाहरुखच्या धाटक्या भावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात चले जैसे हवाएं हे गाणं जायेद आणि अमृता राव यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्यात एक लॉग टेक शूट होता. परंतु, हे शूट करणं जायेदसाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. हा शूट करण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले. या गाण्याच्यावेळी असं काही घडलं ज्यामुळे फराहने त्याला चप्पल फेकून मारली होती. जायेदने बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने घडलेला प्रसंग सांगितला.
"या गाण्याच्या शुटिंगच्या वेळी फराह प्रचंड चिडली होती. आम्ही सगळेच जण वक्तशीरपणे काम करत होतो. सेटवरही शिस्तीचं वातावरण होतं. पण, प्रत्येक टेकनंतर थकायला व्हायचं. त्यात ४०० फूट उंचीवर शूट करणं फार कठीण होतं. त्यात या गाण्यातील अमृताचा सीन शूट झाला होता आणि कॅमेरा माझ्याकडे वळणार होता. पण, तेवढ्यात एक डान्स बेशद्ध पडला. त्यामुळे मला कळलंच नाही काय करावं आणि मी पटकन कट म्हणालो. ज्यामुळे फराह प्रचंड चिडली", असं जायद म्हणाला.
पुढे तो म्हणाला, ''हा माझा सिनेमा आहे आणि मीच कट बोलेन', असं म्हणत ती माझ्यावर प्रचंड चिडली. तिने रागाच्या भरात मला चप्पल फेकून मारली. इतकंच नाही तर शिव्याही दिल्या. त्यानंतर युनिटवाल्यांनी बेशुद्ध पडलेल्या मुलाला उचललं आणि त्याला उपचारांसाठी घेऊन गेले. त्यानंतर मग पुन्हा शुटिंग सुरु झालं."