जीपीटीएल नेटवर्कमुळे झी वाहिन्या पाहायला मिळत नसल्याने सध्या ग्राहक प्रचंड त्रासले आहेत. जीपीटीएल नेटवर्कने झीचे पैसे न दिल्यामुळे झीने जीपीटीएल नेटवर्कमधून आपल्या वाहिन्यांना बाजूला केलेले आहे. यामुळे सध्या लोकांना त्यांच्या आवडत्या अनेक वाहिन्या पाहायला मिळत नाहीयेत. या वाहिन्यांमध्ये झी टीव्ही, अँड टीव्ही, झी सिनेमा, अँड पिक्चर्स, जिंदगी, झी स्टुडिओ, झी कॅफे, झी न्यूज, एचबीओ, कार्टून नेटवर्क, पोगोसह झी मराठी, झी बांगला यांसारख्या अनेक प्रादेशिक वाहिन्यांचादेखील समावेश आहे. न्यायालायने जीपीटीएल नेटवर्कला काही दिवसांपूर्वी झी समूहाचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. पण आजही जीपीटीएलकडून झीला पैसे देण्यात आलेले नाहीत. ही रक्कम आता ५० कोटींच्या घरात पोहोचलेली आहे. वाहिनीशी संबंधित सूत्रांनुसार याचमुळे २० मेपासून झी समूह आणि त्यांच्या भागीदारांनी ५० वाहिन्यांचे प्रसारण जीपीटीएल नेटवर्कवरून बंद केले आहे. तसेच खात्रीलायक सूत्रांकडून कळतेय की, एमएसओने आपल्या पॅकेजमधून ग्राहकांनाही कोणतीही सूट दिलेली नाही. अनेक ग्राहक जीपीटीएलच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षात फोन करून त्यांच्याकडे झी समूहातील वाहिन्या का दिसत नाहीत याची चौकशी करत आहेत. पण तिथेही त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाहीयेत. ग्राहक अतिशय चिडलेले असून जीपीटीएलकडून आपले पैसे परत मागत आहेत. पण त्यांना पैसे परत मिळणार नाहीत, असे सांगितले जात आहे. ग्राहकांना कुमकुम, भाग्य, भाभीजी घर पर है यांसारख्या त्यांच्या आवडत्या मालिका बघायला मिळत नसल्याने त्यांनी डीटीएच सर्व्हिस घ्यायला सुरुवात केली आहे. डीटीएच सर्व्हिसची मंडळीही चांगल्या आॅफर्स देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
50 कोटी न मिळाल्याने ‘झी’ने घेतला निर्णय
By admin | Published: June 18, 2016 3:40 AM