छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. प्रेक्षकांमध्ये त्यांची वेगळीच क्रेझ असते. पण, त्यांना मात्र लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. झी मराठीवर लोकप्रिय कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' येत्या रविवारी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने इन्स्टाग्रामवर 'खुपते तिथे गुप्ते'च्या सेटवरचा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांसोबत ही बातमी शेअर केली.
अवधूत गुप्ते याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो मेकअप करताना, सेटवर पूजा करताना दिसला. 'खुपते तिथे गुप्ते'ची टीमही व्हिडीओमध्ये दिसली. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले की, 'थोडे विसरावे लागते, आठवण्यासाठी... दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी! ह्या पर्वाचा शेवटचा भाग येत्या रविवारी!'. तर शेवटच्या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे पाहायला मिळणार आहेत.
कार्यक्रम बंद होत असल्याचे समजल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, "एवढ्या लवकर का निरोप घेताय???.... आम्ही खूप उत्सुकतेने सवड काढून आवडीने हा कार्यक्रम नेहमी पाहतो....खूप खूप प्रेम". तर एका प्रेक्षकाने कमेंट केली की, इतक्या लवकर हे पर्व का संपणार? कधी एकदा रविवार येतोय आणि खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम पाहायला मिळतोय याची उत्सुकता असायची. जेव्हा तीसर पर्व सुरू होणार हे कळलं तेव्हा प्रचंड आनंद झाला. हे पर्व इतक्या लवकर संपेल अस अजिबातच वाटलं नव्हतं. लवकरच पुढील पर्वसुद्धा येईल अशी आशा आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं नवं पर्व 10 वर्षांनंतर गेल्या 4 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या पर्वाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीने झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते यांनी खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणली.
या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची होती. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळाली. या खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस, डॉ. अमोल कोल्हे, श्रेयस तळपदे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, सई ताम्हणकर, समीर वानखेडे, वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अभिजीत बिचुकले यांनी धारदार प्रश्नांवर उत्तरे दिली.