रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने २५० पेक्षा जास्त भागांचा यशस्वी प्रवास पार पाडला आणि आता हा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सशक्त कथानक असलेली मालिका म्हणून बापमाणूस सर्व प्रेक्षकांची आवडती ठरली. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी सर्व कास्ट आणि क्रू भावनिक झाले होते. मालिकेचा शेवट हॅप्पी एंडिंगने होणार आहे. ही मालिका शेवट पर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल यात काहीच शंका नाही. मालिकेचा प्रवास संपूर्ण टीमसाठी अविस्मरणीय होता. या प्रवासाबद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक हर्षद परांजपे सांगतात, "बघता बघता वेळ कसा निघून गेला आणि या मालिकेच्या शेवटापर्यंत आम्ही कधी पोहोचलो ते कळलंच नाही. हा प्रवास अत्यंत रंजक होता. सगळ्यांनी एकजुटीने काम करून ही मालिका आणि मालिकेचा प्रवास यशस्वी बनवला. सेटवरती आमचं एक कुटुंबच तयार झालं. आता लवकरच या मालिकेचा शेवट प्रेक्षक पाहू शकतील. इथंवरच्या या यशस्वी प्रवासाचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देतो. सगळ्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीनेमुळे ही मालिका आम्ही प्रेक्षकांसाठी रंजक बनवू शकलो असे मी नक्कीच सांगेन."
बापमाणूस या मालिकेत सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ, पूजा पवार आणि रविंद्र मंकणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी या मालिकेत सुर्याची भूमिका साकारणाऱ्या सुयशने देखील भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्याने एक भली मोठी पोस्ट टाकत त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, सुर्या या पात्राच्या दिसण्यापासून ते बोलण्या वागण्यापर्यंत होत जाणाऱ्या बदलांमध्ये एक मस्त अनुभव होता. सुयशने या पोस्टद्वारे मालिकेतील सगळे कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांचे आभार मानले आहेत.