निलेश साबळे (Nilesh Sabale) हे नाव कुणाला माहिती नाही ? झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून निलेश साबळे हे नाव घराघरात पोहोचलं. झी मराठीच्याच महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेला निलेश या शोचा तो विजेता ठरला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून बघितलं नाही. फु बाई फु आणि होम मिनिस्टर हे दोन शो त्याने होस्ट केले. झी मराठीचे अनेक अवॉर्ड शो त्याने होस्ट केलेत. याच निलेशचा एक पहिल्यावहिल्या नाटकाचा किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे.
'झी नाट्य गौरव' या कार्यक्रमात रंगभूमीवरच्या अनेक दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. येत्या ०९ एप्रिल रोजी झी नाट्य गौरव २०२३ हा सोहळा झी मराठीवर प्रसारित केला जाणार आहे. या सोहळ्याची झलक दाखवणारे अनेक प्रोमो झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. निलेश साबळे याचाही एक व्हिडीओ वाहिनीने शेअर केला आहे. या व्हिडीओत निलेशने पहिल्या वहिल्या नाटकाचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
निलेश म्हणतो, 'नाटकाचा पहिलाच प्रयोग... पहिल्याच प्रयोगाला हाऊसफुल्ल थिएटर...आणि मी ब्लँक झालो होतो. मला पुढचं काहीही आठवेना. असं कोणाच बरोबर होऊ नये, असं मी ऐकलं होतं. पण ते माझ्याबरोबर पहिल्याच नाटकात झालं. दिग्गज मंडळी समोर बसलेली होती आणि मला काही आठवेना. पण छोटासा लेखक असल्याने मी त्याक्षणी सुचेल ते बोलायला सुरुवात केली. त्या गवळणींशी मी काहीही बोलत होतो. हिच्याशी गप्पा मार, तिच्याशी गप्पा मार... मी काहीही बडबडतोय, हे त्या तिघींच्याही डोळ्यात मला दिसायला लागलं. पण मला काही केल्या नाटक पुढचं आठवेना. मला जे वाक्य बोलायचं होतं, ज्या वाक्याला त्या येणार होत्या, ते वाक्य येईना म्हणून त्याही येईनात. पुढे काय घडणार आहे, काहीच कळत नव्हतं. शेवटी तसंच म्हणालो, गवळणींनो तुम्ही इथेच थांबा... मी दोन मिनिटांत आलोच...