झीनत अमान (Zeenat Aman ) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूड विश्वात नवे ट्रेंड आणणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत यांचं नाव घेतलं जातं. ७०च्या दशकांत बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुरुषप्रधान चित्रपटांच्या काळात झीनत अमान यांनी चित्रपटातील अभिनेत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं. तूर्तास झीनत अमान एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आल्या आहेत. होय, वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी इन्स्टावर पदार्पण केलं आहे. इन्स्टावरची त्यांची पोस्टही तुफान चर्चेत आहे.
काही तासांपूर्वी झीनत यांनी इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेतली. आपले काही फोटो त्यांनी शेअर केलेत. हे फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. झीनत यांचं कौतुक करताना थकत नाहीयेत. मॅडम, तुम्ही आजही तितक्याच सुंदर दिसता, असं एका युजरने लिहिलं आहे.
आपल्या काही आठवणीही त्यांनी शेअर केल्या आहेत. मी त्यावेळच्या पुरुषप्रधान बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री होते आणि अगदी बिनधास्त सेटवर वावरत असे. तो काळ वेगळा होता. खूप दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक प्रेरणादायी आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर केलेलं फोटोशुट देखील अजुनही लख्खं आठवतं, असं त्यांनी लिहिलं आहे.
मी जे काही आहे ते आईमुळे...
तासाभरापूर्वी झीनत यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या आईबद्दल लिहिलं आहे. मी इतकं विलक्षण आयुष्य जगू शकले, त्याचं कारण म्हणजे मला एका विलक्षण महिलेनं लहानाचं मोठं केलं. माझी आई वर्धिनी हिला तुम्ही पटाखा म्हणू शकता. मोहक, हुशार, सुंदर आणि माझा आधारस्तंभ. ती अभ्यासूवृभीची हिंदू होती. सहिष्णुता, प्रेम व सक्षमीकरणाच्या विचारांची प्रतिक होती. माझे वडील अमानुल्लाह खान यांच्याशी तिने लग्नं केलं. कालांतराने ते वेगळे झालेत. तिला नव्याने प्रेम झालं आणि तिने एका अद्भूत जर्मन व्यक्तीशी लग्न केलं. त्यांना मी अंकल हेंज म्हणायचे. तिने मला स्वत:च्या पायावर उभं व्हायला आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या अटींवर जगायला शिकवलं. ती खरोखर माझ्या पंखाखालचा वारा होती. २००५च्या मुंबईच्या पुरात मी माझी बहुतेक कौटुंबिक छायाचित्र गमावली आणि त्यामुळे जी काही त्यातून आज माझ्याजवळ आहे, तो माझा अमूल्य ठेवा आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
झीनत यांना बॉलिवूडमध्ये ‘झीनी बेबी’ म्हणूनही ओळखलं जायचं. ‘हरे राम हरे कृष्णा’च्या सेटवर देवानंद त्यात्या नावाने हाक मारायचे. यानंतर अनेकजण झीनत यांना याच नावाने बोलवू लागलेत. 1970 साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केलं. यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली. 1971साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.