सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान हजेरी लावणार आहेत. इंडियन आयडल या कार्यक्रमात आता शिल्लक राहिलेल्या सर्वोत्तम सहा स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्या या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत.
इंडियन आयडलच्या 11व्या सत्रातील अत्यंत दमदार परफॉर्मर रोहित राऊतने ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ हे गीत सादर केले. या परफॉर्मन्सनंतर या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने झीनत अमान यांना त्यांच्या जुन्या सह-कलाकारांबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर झीनत अमान यांनी महानायक अमिताभ बच्चन यांविषयी काही सिक्रेट सगळ्यांना सांगितले.
झीनत अमान यांनी सांगितले की, माझ्या सगळ्या सहकलाकारांमध्ये अमिताभ असा कलाकार होता, जो सगळ्यात जास्त रिटेक्स घ्यायचा. ‘डॉन’ चित्रपटातील ‘खईके पान बनारसवाला’ या गाजलेल्या गीताचे चित्रीकरण करताना अमिताभने अनेक रिटेक्स घेतले होते. कारण ते गाणे अगदी परफेक्ट व्हावे अशी त्याची इच्छा होती. इतकेच नाही तर अमिताभ हा त्या काळातला सर्वात वक्तशीर अभिनेता होता. तो नेहमी वेळेवर हजर असायचा किंवा कधी कधी तर वेळेच्या आधीही यायचा.”
रोहित राऊतचा परफॉर्मन्स झीनत अमान यांना प्रचंड आवडला. त्याचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, रोहितच्या गाण्यात इतका दम आहे की, तो इंडियन आयडलचा विजेता ठरू शकतो.