फिल्म इंडस्ट्रीत आजकाल स्टार कलाकार अवाजवी मानधन घेतात. या मुद्द्यावर कित्येक निर्मात्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माता करण जोहरनेही (Karan Johar) यावर भाष्य केलं होतं. नुकतंच अनुपमा चोप्रा यांच्या राऊंड टेबलमध्ये करण सहभागी झालेल्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी झोया अख्तरने (Zoya Akhtar) थेटच करण जोहर यासाठी कारणीभूत असल्याचं वक्तव्य केलं. तसंच करण जोहरनेही यावर प्रतिक्रिया दिली.
'द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडियाच्या डायरेक्टर्स राऊंडटेबलमध्ये झोया अख्तर, करण जोहर, महेश नारायण, रणजीत, वेत्री मारन यांनी हजेरी लावली. यावेळी ए स्टार कलाकारांच्या मानधनाचा मुद्दा चर्चेत आला. तेव्हा झोया म्हणाली, "त्यांना कळणारही नाही फक्त करणने त्यांना एवढे पैसे देणं बंद करावं. बास इतकंच."
यावर करण जोहर म्हणाला, "मी आता तेवढे पैसे देत नाही. मी त्यांना म्हणतो खूप खूप आभार मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मी कोणालाच देत नाही. तुमचे मागील दोन सिनेमे कोणते होते? पहिल्या दिवशी किती कमाई केली? तू कोणत्या अधिकाराने एवढं मानधन मागतोय? मी किल नावाच्या सिनेमाची निर्मिती केली. मी यासाठी पैसे खर्च केले कारण ही हाय कॉन्सेप्ट फिल्म होती ज्यात एक नवोदित कलाकार होता. आम्ही ज्या ज्या स्टारकडे गेलो, त्यांनी मला बजेट एवढं तर मानधन मागितलं. आता जर बजेट ४० कोटींचं आहे, तर तू मला ४० कोटी मानधन कसं मागू शकतो? तू मला गॅरंटी देतो का की सिनेमा १२० कोटींची कमाई करेल. काहीच गॅरंटी नाही ना? मग शेवटी मी एक नवीन कलाकार घेतला आणि मला हे सांगावं लागतंय की तो आऊटसायडर आहे."