अपघाताने जन्मलेला नास्ता : कॉर्न फ्लेक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:50 AM2021-08-21T07:50:19+5:302021-08-21T07:50:44+5:30
Corn Flakes : बऱ्याच वेळाने पाहिले तर गहू किंचित आंबलेले होते. तरी पण केलॉग बंधूंना ते टाकून द्यावेसे वाटले नाहीत. काहीतरी प्रयोग करून पाहू म्हणून त्यांनी ते दाब देऊन सपाट लाटले, सुकवले आणि शेकवून घेतले.
- मेघना सामंत
गेल्या दोन रसयात्रांमधून मक्याचा वेध घेतल्यावर मक्याच्या पोह्यांवर लिहिणं ओघानेच आलं. या पोह्यांचा शोध लागला तो चक्क अपघातातून. जॉन हार्वे केलॉग हे अमेरिकेतले एक प्रतिष्ठित डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ होते. वृत्तीने कट्टर धार्मिक. मिशिगनमध्ये विल किथ केलॉग या आपल्या भावासोबत ते एक आरोग्य केंद्र चालवीत. एकदा या केंद्राच्या स्वयंपाकघरात शिजविलेले गहू तसेच राहून गेले.
बऱ्याच वेळाने पाहिले तर गहू किंचित आंबलेले होते. तरी पण केलॉग बंधूंना ते टाकून द्यावेसे वाटले नाहीत. काहीतरी प्रयोग करून पाहू म्हणून त्यांनी ते दाब देऊन सपाट लाटले, सुकवले आणि शेकवून घेतले. गव्हाचे मस्त कुरकुरीत पोहे तयार झाले. तेच दुधात घालून त्यांनी आपल्या सॅनिटेरियममधल्या रुग्णांना नाश्ता म्हणून वाढले. त्यांना ते फार आवडले. गहू वायाही गेले नाहीत आणि केलॉग यांचा सात्त्विक अन्नाचा आग्रहही पुरा झाला.
तामसी अन्नामुळेच डोक्यात तामसी विचार येतात, अमेरिकन माणसांनी सकाळीसकाळी सात्त्विक आहार घेतला तर त्यांची वृत्ती शांत, सोज्ज्वळ बनेल यावर जॉन केलॉग यांचा ठाम विश्वास होता. गव्हाच्या पोह्यांवरून पुढे केलॉग बंधूद्वयाला मक्याच्या पोह्यांची कल्पना सुचली. प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी हे कॉर्न फ्लेक्स बाजारपेठेत विक्रीसाठी उतरविले. सर्वसामान्यांना आवडावेत म्हणून त्यात साखर घालावी की नाही यावरून भावाभावांत मात्र कायमचं वितुष्ट आलं. असो.
१८९४ मध्ये घडलेल्या या अपघाताने अमेरिकेत अक्षरशः न्याहारीक्रांती घडून आली. मक्याच्या पोह्यांना
कल्पनातीत प्रतिसाद लाभला. याअगोदर जड, मेदयुक्त न्याहारी खाण्याची प्रथा होती. भरपूर शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी ती योग्य. बैठं काम करणाऱ्या शहरी बाबूंसाठी हलकाफुलका नाश्ताच बरा. आजचा अमेरिकन माणूस कॉर्न फ्लेक्स वजा करून ब्रेकफास्टचा विचार करू शकत नाही.
त्याच्या वृत्तीमध्ये काही फरक पडलाय की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल; पण खोका उघडला, वाडग्यात कुरकुरीत पोहे घेतले, त्यावर थंडगार दूध ओतलं की खायला सुरुवात, इतका सोपा तरीही पोटभरीचा नाश्ता दुसरा कुठला? अलीकडे भारतातही अनेक जण सकाळच्या आहारात कॉर्न फ्लेक्सना पसंती देतात ते सोय म्हणून; पण फोडणीचे पोहे, उपमा, इडल्या, पराठे अशा दणदणीत आव्हानांसमोर मकापोह्यांचा जम म्हणावा तितका बसलेला नाही.