कोळसा घातलेला पदार्थ कधी खाल्ला आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:17 PM2017-12-05T17:17:40+5:302017-12-05T17:26:43+5:30
कोळसा वापरून फोडणी देण्याची पद्धत भारतीय पाककलेत तशी बरीच जुनी आहे. आमटी, ताक यांना कोळशाची फोडणी देऊन स्मोकी चव दिली जाते. आता मात्र थेट आइस्क्रिमपासून बर्गरपर्यंत, सॅण्डविचपासून पॅनकेक तसेच मॉकटेल्स ड्रिंकपासून नूडल्सपर्यंत, पिझ्झापासून टाकोजपर्यंत यासर्व पदार्थामध्ये कोळसा वापरला जातोय.
-सारिका पूरकर-गुजराथी
कोळसा. एक इंधन.. चुल, शेगडी, रेल्वे, इस्त्री, पाणी तापवायचे बंब यांच्यासाठी इंधन म्हणून कोळस वापरला जातो.,एवढीच काय ती कोळशाची ओळख. परंतु हाच कोळसा सध्या लेटेस्ट फूड ट्रेण्ड बनला आहे हे माहिती आहे का आपल्याला?
कोळसा वापरून फोडणी देण्याची पद्धत भारतीय पाककलेत तशी बरीच जुनी आहे. आमटी, ताक यांना कोळशाची फोडणी देऊन स्मोकी चव दिली जाते. आता मात्र थेट आइस्क्रिमपासून बर्गरपर्यंत, सॅण्डविचपासून पॅनकेक तसेच मॉकटेल्स ड्रिंकपासून नूडल्सपर्यंत, पिझ्झापासून टाकोजपर्यंत यासर्व पदार्थामध्ये कोळसा वापरला जातोय.
चारकोल इफेक्ट तसेच ब्लॅक फूड ट्रेण्ड म्हणून हा ट्रेण्ड सध्या जगभरातील फूड इण्डस्ट्रित फेमस झालाय. अमेरिका, मिडल इस्टनंतर भारतातही ब्लॅक फूडची काळी जादू वेगानं लोकप्रिय होतेय.
पदार्थात कोळसा तो कसा?
खरंतर पदार्थांमध्ये कोळसा नाही तर राख वापरली जाते आहे. नारळाची करवंटी, लाकूड जाळून जी राख तयार होते, ती चाळून नंतर पदार्थांसाठी वापरली जाते. कोळशाला आणि राखेला स्वत:ची वेगळी चव नसते. त्यामुळे पदार्थांमध्ये घातल्यावरही त्या पदार्थांच्या मूळ चवीत फारसा फरक पडत नाही. म्हणूनच केवळ पदार्थांना काळा रंग प्राप्त होण्यासाठी राखेचा वापर केला जात असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण आइस्क्रिम आणि अन्य पदार्थांना काळा रंग प्राप्त करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. काळे तीळ हा एकमेव पर्याय असला तरी त्याची पावडर केल्यावर काळाशार रंगच येईल याची खात्री नसते. म्हणून नारळाच्या करवंटीची राख हा पर्याय सर्वच हॉटेल आणि रेस्टॉरण्टमधील शेफ वापरत आहेत. लॉस एंजलिस येथील एका हॉटेलमध्ये २०१६ मध्ये हॅलोवीन फेस्टिव्हलसाठी चारकोल आइस्क्रिम ठेवण्यात आलं होतं. ते प्रचंड लोकप्रिय झालं आणि या ब्लॅक फूडची लहरच मग जगभरात उमटली.
आज मुंबईमधील अनेक रेस्टॉरण्ट्समध्ये या राखेचा वापर मात्र मुख्य घटक म्हणून केला जातोय. पावभाजी, अव्हाकाडो मूस यासारख्या पदार्थांमध्ये ही राख वापरली जात आहे. कार्बन पावभाजी हा मुंबईतील मेन्युकार्डवर झळकलेला हिट मेन्यू ठरला आहे. काही हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे की, वेगळा रंग, वेगळी चव म्हणून खवय्ये या प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. ते या पदार्थांचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे आमच्या पदार्थाची जाहिरातही होते.
आरोग्यासाठी लाभदायक?
एकेकाळी दात घासण्यासाठी राखेचा उपयोग केला जात असे. तसेच भांडी घासण्यासाठीही होत असे. परंतु, या राखेचा वापर एक दिवस याप्रकारेही केला जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु, राखेचा वापर पदार्थांमध्ये सुरु झाल्यावर अनेकांनी यावर आक्षेप घेतला. राख पदार्थांच्या माध्यमातून खाणे हे कितपत योग्य आहे. आरोग्यासाठी ते हानीकारक तर नाहीये ना? परंतु, असं काहीही नसल्याचं अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. शरीरातील काही हानीकारक विषाणुंचा खात्मा करण्याचे काम राखेतील घटक करतात. असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी प्रमाणातच याचं सेवन करायला हवं अशी सूचनाही त्यांनी केली आहे. दिवसातून दोन वेळेस ७५ ग्रॅम हे ते योग्य प्रमाण आहे!