पान खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:47 AM2018-10-13T10:47:02+5:302018-10-13T10:51:50+5:30
आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना नागवेल असंही म्हटलं जातं.
आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना नागवेल असंही म्हटलं जातं. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. या पानांची मुळ चव ही तिखट स्वरूपात असते, परंतु यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते. या पानामध्ये गुलकंद, वेलची, सुपारी, कात, चुना यांसारखे अनेक मसाले टाकले जातात. त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यांनुसार त्यांना वेगवेगळी नावंही देण्यात आली आहेत. त्यामध्ये गोड पान, साधं पान, बनारसी पान यांसारखे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या या पानांसोबत अनेक नवनवीन प्रयोगदेखील करण्यात येत आहेत. या पानांमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अॅड करण्यात येता. त्यात चॉकलेट पान, चंदन पान, स्ट्रॉबेरी पान यांसारखे असंख्य प्रकार पाहायला मिळतील.
अनेकदा पान खाणं ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोकं व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्व नष्ट होतात. त्यामुळे असे न करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून खाणं फायदेशीर ठरतं. पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली किड, भूक वाढवणं त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते. जाणून घेऊया पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
1. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी
पान खाल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. हे सलायवरी ग्लॅन्ड्स सक्रिय करून लाळ तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. बद्धकोष्ठाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या व्यक्तिंसाठी ही नागवेलीची पानं खाणं फायदेशीर ठरतं.
2. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी
नागवेलीच्या पानांमध्ये अनेक गुणकारी तत्व आढळून येतात. ही तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात. ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यानी पान खाणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे पान तयार करताना वापरण्यात येणारे मसाले म्हणजेच लवंग, कात आणि वेलची यांचा वापर मुखवास म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे पान खाणाऱ्यांच्या लाळेमध्ये एस्कॉर्बिक अॅसिडचा स्तरही सामान्य असतो. त्यामुळे अनेक तोडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
3. हिरड्यांवरील सूज कमी करण्यासाठी
हिरड्यांवर सूज आली असल्यास किंवा गाठ आली असल्यास पान खाणं फायदेशीर ठरतं. पानांमध्ये असलेली तत्व या समस्या दूर करण्याचे काम करतात.
4. सामान्य आजारांवरही फायदेशीर
जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर अशातच नागवेलीची ही पानं फायदेशीर ठरतील. एखादे पान मधासोबत खाल्याने फायदा होतो. त्याचसोबत पानामध्ये असलेले एनालजेसिक गुणधर्म डोकेदुखीवर रामबाण उपाय ठरतात. त्याचप्रमाणे एखादी जखम झाल्यास ही पान खाल्याने जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
टिप : वरील उपाय आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही काहींना याचा त्रास होण्याचीही शक्यता असते. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.