औषधी आवळ्याच्या चविष्ट पाककृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 06:43 PM2017-12-13T18:43:06+5:302017-12-13T18:47:36+5:30
आवळा हा फक्त औषधी नसतो त्यापासून चविष्ट पदार्थही तयार करता येतात.
सारिका पूरकर-गुजराथी
आवळा फक्त सुपारी, मुरांबा, मोरआवळा , लोणचं किंवा च्यवनप्राश पुरतीच मर्यादित नाही. या बहुगुणी आवळ्याचा अनेक प्रकारे आहारात समावेश करता येतो. आवळ्यापासून भात, कढी, रस्सम, रायता असे अनेक चविष्ट पदार्थ करता येतात.
1) आवळ्याचा भात :- मिक्सरच्या भांड्यात आवळ्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ घालून बारीक वाटून घ्या. भात मोकळा शिजवून गार करु न घ्या. मेथीदाणे भाजून पूड करु न घ्या. तेल तापवून हिंग, जिरे, कढीपत्ताची फोडणी करा. यातच हरभरा डाळ, उडीद डाळ घालून परता. नंतर शेंगदाणे घालून आणखी परतून घ्या. यात आता मेथीदाणे पूड, आवळ्याचं वाटण घालून परतून घ्या. गार केलेला भात आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगले परतून एक वाफ काढा. सर्व्ह करण्याआधी त्यावर कोथिंबीर पेरावी.
2) आवळ्याचा जाम :- आवळे धुवून वाफवून घ्यावेत. फोडी करु न मिक्सरमधून वाटावेत. कढईत आवळ्याचं वाटण आणि साखर घालून मिश्रण चांगलं आटवून घ्यावं. 20 आवळ्यांसाठी 1 कप साखर हे प्रमाण असावं. मिश्रण आटलं की यात मध घालून ते बरणीत भरु न ठेवावं.
3) आवळ्याची कढी :- एक पारंपरिक परंतु अत्यंत चविष्ट असा हा प्रकार नक्की करून पाहा. आवळे धुवून चिरून घ्यावेत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेले आवळे, खोवलेलं ओलं खोबरं, भाजलेले जिरे, भाजलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावं. गरजेनुसार पाणी घालून कढीला चांगली उकळी काढावी.
4) आवळ्याचा रायता :- मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे, ओले खोबरे, मीठ, हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात. सायीचं दही फेटून त्यात हे वाटण घालावं. सोबत काकडीच्या फोडीही घालाव्यात. चवीला साखर घालावी. तेल गरम करु न जिरे-मोहरी-कढपत्त्याची फोडणी करु न रायत्यावर घालावी.
5) आवळा रस्सम :- जिरे, काळीमिरी, उडीदडाळ, धने कोरडेच भाजून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात हे मसाले, आवळ्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, आलं आणि पाणी घालूून वाटून घ्या. एका भांड्यात हे वाटण भरपूर पाणी आण हळद, मीठ घालून उकळून घ्या. साजूक तूपात जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करु न ती रस्समवर घालावी. कोथिंबीर घालायला मात्र विसरु नका. यात हवी असल्यास शिजवलेली तुरडाळ, आलं-लसूण पेस्टही घालू शकता.