गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि आगळा-वेगळा थाटमाट पाहायला मिळत आहे. अशातच बाप्पाचा प्रसाद म्हणून काय द्यावे? हा सर्वांसमोर उभा असलेला प्रश्न.
बाप्पाची पूजा किंवा आरती झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते प्रसादाचे. आरतीनंतर हातात पडलेल्या त्या प्रसादाची मजा काही औरच... अशावेळी पेढे, बर्फी, साखरफुटाणे, लाडू यांसारखे अनेक पदार्थ ट्राय करण्यात येतात.
अनेकदा तर वेळेअभावी सर्रास बाजरात मिळणाऱ्या पदार्थांचा आधार घेण्यात येतो. पण अशावेळीच घरच्या घरी सोप्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या पदार्थाचा पर्याय निवडू शकता. प्रसादासाठी सहज तयार करता येणारा आणि चवीलाही उत्तम असणारा पदार्थ म्हणजे 'पंचखाद्य' याला 'खिरापत' असंही म्हटलं जातं. अगदी सोपा आणि चटकन तयार करता येणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही लाभदायक ठरतो. जाणून घेऊयात खिरापत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...
साहित्य :
- 3/4 कप किसलेले सुके खोबरे (सुक्या खोबर्याची 1/2 वाटी)
- 1 चमचा खसखस
- 150 ग्रॅम खडीसाखर (पीठीसाखरही वापरू शकता)
- वेलची पूड
- 6 ते 7 खारका
- 8 ते 10 बदाम
कृती :
- खारकांच्या बिया काढून टाकाव्यात आणि खारकांची पूड करून घ्यावी.
- बदाम मिक्सरमध्ये टाकून बारीक पूड करून घ्यावी.
- किसलेले सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. खोबरे भाजून झाल्यावर एका ताटामध्ये काढून घ्यावं.
- मंद आचेवर खसखस खरपूस भाजून खलबत्यामध्ये कुटून घ्यावी.
- बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी.
- खडीसाखर खलबत्यामध्ये थोडी कुटून घ्यावी. भाजलेलं खोबरं, भाजलेली खसखस, भाजलेली बदाम आणि खारकांची पूड, खडीसाखर आणि थोडीशी वेलची पावडर एकत्र करून घ्या. तुम्ही हे मिश्रण एकत्र करून मिक्सरमध्येही बारिक करू शकता.
- बाप्पाचा प्रसाद म्हणून वाटण्यासाठी खिरापत तयार आहे.