सगळीकडे गणेशोत्सवाचा गाजावाजा सुरू असून घराघरात बाप्पाचे आदरातिथ्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. अनेकदा वेळेअभावी हे पदार्थ बाजारातून आणले जातात. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हटके पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसादासाठी तयार करू शकता.
सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊयात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात घरच्या घरी तयार करता येणाऱ्या खजूराचे लाडू तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- एक कप खजूर
- सुका मेवा ( बारिक कापलेले काजू, बदाम, पिस्ता,मनुके)
- तीन चमचे मावा
- एक कप दूध
- एक कप साखर
- अर्धा चमचा वेलची पावडर
- दोन मोठे चमचे ओल्या नारळाचं खोबरं
कृती :
- सर्वात आधी खजूराच्या बिया काढून ते छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे अर्धा कप दुधामध्ये भिजवून मिक्सरमधून बारिक करून त्याची पेस्ट तयार करा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तूप गरम करून घ्या.
- तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पिस्ता, खजूर आणि साखर टाकून जवळपास 5 मिनिटांपर्यंत परतून घ्या. तुम्ही साखरेऐवजी गूळही वापरू शकता.
- मिश्रण चांगलं परतल्यावर त्यामध्ये मावा आणि दूध टाकून शिजवून घ्या.
- त्यानंतर यामध्ये वेलचीची पावडर आणि बारिक केलेला सुका मेवा टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करा.
- मिश्रण हाताल चिटकू नये म्हणून तळव्यावर थोडं तूप लावून घ्या.
- मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने गोल लाडू वळून घ्या.
- खोबऱ्यामध्ये लाडू घोळवून घ्या.
- तयार आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असे खजूराचे लाडू.