अशी कोथिंबीर वडी बनवा की तोंडात टाकताच विरघळेल !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 07:55 PM2018-08-11T19:55:27+5:302018-08-11T19:56:45+5:30
कोथिंबीर वड्या आपण कायम बनवत असतो पण तोंडात टाकता क्षणी विरघळणारी अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवायची असेल खाली दिलेली पाककृती नक्की अमलात आणा !
पुणे : श्रावण महिन्यात सर्वाधिक ताज्या आणि हिरव्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. शरीरात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या भाज्यांच्या काही चवदार रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.खरं तर कोथिंबीर वड्या आपण कायम बनवत असतो पण तोंडात टाकता क्षणी विरघळणारी अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवायची असेल खाली दिलेली पाककृती नक्की अमलात आणा !
साहित्य :
- भरपूर ताजी कोथिंबीर
- हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण वाटून
- मीठ
- पांढरे तीळ
- डाळीचे पीठ
- तांदळाचे पीठ
- तेल
कृती :
ताजी कोथिंबीर निवडून, धुवून आणि बारीक चिरून घ्या.
परातीत कोथिंबीर, आवडेल त्या प्रमाणात मिरची, लसूण आणि जिऱ्याचे वाटण टाकावे.
वाटण जरा जास्त टाकावे. कारण वड्या उकडल्यावर त्याचा तिखटपणा कमी होतो.
मीठ टाकावे आणि चमच्याने हे सर्व एकजीव करावे. मिठामुळे या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात लागेल.
त्यात सुरुवातीला दोन चमचे हरभरा डाळीचे पीठ (बेसन)टाकावे. त्यात एक चमचा तांदुळाचे पीठ टाका. आवश्यकतेनुसार दोनास एक प्रमाणात डाळीचे आणि तांदुळाचे पीठ टाका.
एक लहान चमचा पांढरे तीळ टाकावे. मिश्रणात पाणी टाकू नये. कोथिंबिरीला सुटलेल्या पाण्यातच घट्ट मिश्रण भिजवावे.
या पिठाच्या लांबट सुरळी करून घ्यावी. कुकरमध्ये पाणी उकळावे. तेल लावलेल्या पातेल्यात वड्या ठेवाव्यात. शक्यतो एकावर एक ठेवू नये.१५ मिनिटे वाफवून घ्याव्यात.
तेल कडकडीत तापवावे. त्यात मध्यम जाड वड्या कापाव्यात.
या वड्या तांदळाच्या सुक्या पिठात घोळवून तळाव्यात.
जास्त तेल नको असेल तर वड्या शॅलो फ्राय करता येतात. मात्र त्यांना वरून तांदळाचे पीठ लावू नये.
गरमागरम, चटपटीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार.