हळूहळू सगळीकडे पावसाचं आगमन होत आहे. पावसाच्या सरी बरसल्या की, वातावरणात गारवा पसरतो. नको असलेला उन्हाळा बाजूला सारून हा गारवा हवाहवासा वाटतो. अशातच चटपटीत पदार्थांची सोबत मिळाली तर त्या मैफिलीची बात काही औरचं..... पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा किंवा बटाटे वडे यांसारख्या पदार्थांना भारी डिमांड असते. अशातच तुम्ही जर हटके पदार्थाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक भारी रेसिपी सुचवू शकतो. ही रेसिपी पावसाळ्यातच नाही तर कधीही चहासोबतच्या नाश्त्यासाठी तुम्ही तयार करू शकता.
आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्याला चाट, भजी किंवा स्नॅक्स आवडत नसतील. जर तुम्हीही अशा पदार्थांचे शौकीन असाल तर आज आम्ही तुम्हाला तंदूरी आलू टिक्का तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा एक प्रसिद्ध उत्तर भारतील पदार्थ आहे. जो अनेक लोक चवीने खातात. खास गोष्ट म्हणजे, हा पदार्था लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांनाही आवडतो.
तंदूरी आलू टिक्का रेसिपी तयार करण्यासाठी साहित्य :
- लहान बटाटे
- गरम मसाला पावडर
- धने पावडर
- अर्धा चमचा लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- पाणी काढलेलं दही
- लाल मिरची पावडर
- कसूरी मेथी
- व्हेजिटेबल ऑइल
तंदूरी आलू टिक्का रेसिपी तयार करण्यासाठी कृती :
- गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये मीठ एकत्र करून बटाट उकडून घ्या.
- बटाटे उकडल्यानंतर त्यांची साल काढून तुकडे करा. आता बटाट्याचे तुकडे एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये दही एकत्र करा.
- आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि कसूरी मेथी एकत्र करा. काही वेळासाठी हे मिश्रण तसचं ठेवा.
- आता एक नॉन स्टिक पॅन घ्या आणि त्यामध्ये थोडं तेल गरम करा. जेव्हा तेल गरम होइल तेव्हा त्यामध्ये मॅरिनेट केलेले बटाटे टाकून फ्राय करून घ्या.
- फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून लिंबाचा रस टाकून व्यवस्थित एकत्र करा.
- तुमच्या आवडीच्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा 'तंदूरी आलू टिक्का'.