एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:07 AM2021-10-16T06:07:24+5:302021-10-16T06:07:43+5:30

Food: ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण.

A pepper's journey around the world .. | एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

Next

-  मेघना सामंत 
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण. सोळाव्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाला मिरची कशी असते हेच ठाऊक नव्हतं असं म्हटलं की, आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. पण खाद्य इतिहासकारांचं एकमत आहे की, भारतीय स्वयंपाकाला पोर्तुगीजांनीच मिरचीचा परिचय घडवला. तिकडे कोलंबस चटकदार मसाल्यांच्या शोधात निघालेला. विशेषतः भारतीय काळ्या मिरीच्या. पण त्याचं तारू भरकटलं आणि तो पोचला मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर. तिथे इतरही भरपूर एक्झॉटिक झाडा-पिकांची मांदियाळी त्याची वाट पाहत होती म्हणा. पण, सगळ्यात आवडली ती मिरची.
काळ्या मिरीशी या मिरचीचा झणका थोडा मिळताजुळता. काळी नाही तर नाही, हिरवी चालेल म्हणून हिलाच ‘पेपर’ हे नाव चिकटलं. तिथून मिरची युरोपला पोचली. सपक फिरंगी जेवणाला मिरचीची गरजच होती. त्या काळात भारतीय काळ्या मिरीचे भाव युरोपात सोन्याच्या तोडीचे झालेले, अशा वेळी थोड्या फिकट कॅप्सिकमचा पर्याय त्यांना पसंत पडला.
तिथून मग मिरचीची भ्रमंती सुरू झाली. भारतातही तिचा प्रवेश झाला तो पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्यावेळी. इथे आधी काळ्या मिरीशी ओळख असल्यामुळे या नव्या तिखट शेंगेला ‘मिरशेंग/ मिरश्यांग’ असं नाव पडलं. त्यावरूनच आला ‘मिरची’ हा शब्द.
पोर्तुगीजांनी स्वतःसोबत आणलेली बटाटा, अननस, टोमॅटो अशी नवनवी पिकं इथे रुळायला, इथल्या स्वयंपाकात सामावून जायला कमीअधिक वेळ लागला ; पण, मिरचीने बाजी मारली. इथल्या मातीत ती जोमाने रुजली. स्वयंपाकघरांत तिच्याविना पान हालेना. आधी गोवा-महाराष्ट्र, नंतर संपूर्ण दक्षिण भारत तिने पादाक्रांत केला. खरंखोटं माहिती नाही पण, असं म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या युद्धमोहिमांमुळे उत्तर भारताला मिरचीशी तोंडओळख झाली. जेवणातल्या मिरचीमुळे मराठी सैन्य अधिक त्वेषाने लढू शकतं असा उत्तरेकडे समज होता... (पूर्वार्ध)
(askwhy.meghana@gmail.com)

Web Title: A pepper's journey around the world ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न