पुणे : पावसातून घरी आल्यावर काही गरमगरम खायची इच्छा असेल तर लेमन कोरिएण्डर सूप हा बेस्ट पर्याय आहे. मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका.
साहित्य :
लिंबू अर्धे
कोथिंबीर अर्धी वाटी
पाणी तीन वाट्या
लसूण एक पाकळी
मिरची एक (तिखट असल्यास अर्धी)
कॉर्नफ्लोअर (मक्याचे पीठ)
मीठ
कृती :
- तीन वाटी पाण्यात चमचाभर बाजूला ठेवून बाकी कोथिंबीर टाका. त्यात बारीक चिरलेल्या लसणाचे तुकडे, मिरचीचा तुकडा आणि पाव चमचा मीठ घालून दहा मिनिटे उकळवून घ्या.
- आता मिक्सरच्या भांड्यात उकळलेल्या पाण्यातील कोथिंबिरीचा चोथा, लसूण आणि मिरचीचा तुकडा एकजीव करून घ्या.
- आता त्या उकळलेल्या पाण्यात कोथिंबीरीचे वाटण, आठ ते दहा थेंब लिंबू घालून पुन्हा उकळी घ्या.
- वाटीत दोन तीन चमचे पाण्यात लहान चमचा भरून कॉर्नफ्लोअर एकत्र करा. गुठळी ठेवू नका.
- हे मिश्रण उकळत्या पाण्यात घाला आणि छान दाटसर सूप होईपर्यंत उकळून घ्या आणि कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा लेमन कोरिएण्डर सूप.