होळिगे, बोब्बट्टु... आणि पुरणपोळी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 07:12 AM2021-12-18T07:12:21+5:302021-12-18T07:12:48+5:30

बाराव्या शतकापासूनच्या जुन्या कन्नड आणि तेलुगू पाकपुस्तकांत पुरणपोळीचे उल्लेख आहेत.

spacial article on food in karnataka Holige Bobbattu and Puranpoli | होळिगे, बोब्बट्टु... आणि पुरणपोळी !

होळिगे, बोब्बट्टु... आणि पुरणपोळी !

googlenewsNext

प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की, पुरणपोळी महाराष्ट्रातच जन्मली आणि फक्त इथेच बनते. पण, हिच्या उगमाबद्दल बरेच वाद आहेत. कर्नाटकचे लोक स्वतःकडे श्रेय घेतात. तितक्याच तत्परतेने आंध्र प्रदेशचेही घेतात आणि तामिळनाडूचेही! बाराव्या शतकापासूनच्या जुन्या कन्नड आणि तेलुगू पाकपुस्तकांत पुरणपोळीचे उल्लेख आहेत. विजयनगर साम्राज्याच्या विस्तारासोबत दक्षिणेत पुरणपोळीचं अधिराज्य वाढत गेलं असावं. महाराष्ट्रात मात्र पुरणपोळीचे लिखित उल्लेख सतराव्या शतकापासून (पेशवाई) मिळतात. म्हणजे आंध्र-कर्नाटकच्या मानाने फारच उशिरा.

नऊशे वर्षांपूर्वीच्या कृतीतलं पुरण मुगाच्या डाळीचं होतं. मुगाची जागा चण्याच्या डाळीने कधी घेतली हे अज्ञात आहे. पुरण भरून तळलेले कडबू, करंज्या, बूरिलु, शकुनउंडे (सुकरुंडे), वाफवलेली दिंडं ह्याही विंध्याचलाच्या दक्षिणेकडच्या खासियती. पण, पुरणपोळी ती पुरणपोळी... कर्नाटकातली होळिगे पोळपाटावर एकसमान लाटलेली, मोठ्या आकाराची तर, आंध्रची बोब्बट्टु तळहाताएवढी, केळीच्या पानावर थापून केलेली. गोव्यात आणि तामिळनाडूत अनेक ठिकाणी यातच ओलं खोबरं वाटून घालतात. गुजरातने महाराष्ट्रातून पुरणपोळी उचलली पण, पुरण तूरडाळ-साखरेचं केलं. पारशी लोकांनी दाल-पोळीला दत्तक घेऊन आवरण खुसखुशीत पापुद्र्यांचं केलं.

महाराष्ट्रात अजूनही पुरणपोळ्यांवरून सुगरणीची परीक्षा केली जाते. पण, इथे अक्षरशः बारा कोसांवर भाषा बदलावी तशी पुरणाची कृती बदलते, लाटण्याची, भाजण्याची पद्धत बदलते. फूटभर व्यासाची रेशमासारखी पातळ पुरणपोळी दुसऱ्या प्रांताच्या परीक्षेत साफ नापास होते, तर, तिथली गुबगुबीत पुरणपोळी इकडच्यांना सपशेल नामंजूर. तूप हा पुरणपोळीचा जीवनसाथीच; तरी दूध, कटाची आमटी, नारळाचं दूध असे स्थानिक जोडीदारही असतात.. हे प्रांतिक वैविध्य अनेकदा अस्मितेचा मुद्दा बनतं. आमच्या प्रांताची तीच खरी पुरणपोळी म्हणायला खवय्ये कमी करत नाहीत. हा वाद सोडल्यास, महाराष्ट्रात पुरणपोळीला जो मान आहे तो, इतर मिष्टान्नाला नाही. होळीपासून दत्तजयंतीपर्यंत कुठल्याही सणाला साजून दिसते ती. त्यामुळे, ‘जन्मभूमी’चा प्रश्न अनुत्तरित असला तरी तिला ‘मराठी’च म्हणावं असा ठराव करायला हवा !

- मेघना सामंत 
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
askwhy.meghana@gmail.com
 

Web Title: spacial article on food in karnataka Holige Bobbattu and Puranpoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.