मुंबई- साऊथ इंडियन जेवण आवडणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज 'वर्ल्ड इडली डे' आहे. पण आपल्या सगळ्यांना आवडणारी इडली दक्षिण भारतातून नाही तर दुसऱ्या एका देशातून आली आहे. ही गोष्ट तुम्हाला कदाचीत पटणार नाही पण हे खरं आहे. आजपासून जवळपास इ.स.पू. 1250मध्ये भारतात इडली बनविली गेली होती. आजच्या वर्ल्ड इडली डेच्या निमित्ताने आपण इडलीबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
जाणकारांच्या मते इडली बनविण्याचं काम सर्वात आधी इंडोनेशियामध्ये सुरू झालं होतं. इंडोनेशियामध्ये उकडलेले पदार्थ बनविण्याची पद्धत जास्त आहे. द हिंदूमधील रिपोर्टनुसार, भारतात सगळ्यात आधी भारतीय राजाच्या एका स्वयंपाकीने इसवी सन पूर्व 800 ते 1200 मध्ये इडली बनविली होती. पण याला अनेक अन्न तज्ज्ञांनी विरोध केला आहे. इंडोनेशियातून आलेले व्यापारी त्यांच्याबरोबर इडलीची पाककृती दक्षिण भारतात घेऊन आले होते. तेव्हापासूनच इडली भारतात बनवायला सुरूवात झाली, असं त्यांचं मत आहे.
इडलीचा संबंध इस्लाम धर्माशीही जोडला जातो. अरबमधील लोक त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीबद्दल खूप संवेदनशील असायचे. एखाद्या पदार्थाची रेसिपी ते पटकन कुणालाही सांगायचे नाहीत. हे व्यापारी हळूहळू भांडवलशाहीतून इस्लाम धर्मात जाऊ लागले. धर्म परिवर्तनानंतर भारतीय जेवण त्यांना फार आवडलं नाही. तेव्हा त्यांनी तांदळाचे गोळे (इडली) बनवायला सुरूवात केली, असं मानलं जातं.
इडली कुठूनही आली असली तर आज सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. दक्षिण भारतापासून ते इतर भागातही लोक आवडीने इडली खातात. सध्या भारतात 7 विविध प्रकारच्या इडली तयार केल्या जातात. यामध्ये रवा इडली, वेजिटेबल इडली, स्टफ इडली, मुगडाळ इडली, मायक्रोवेव इडली, पेपर इडली, ओट्स इडली असे विविध प्रकार आहेत. इडलीचे हे 7 प्रकार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत.