जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. पदक पटकावण्यामागचे प्रत्येक खेळाडूचे कारण हे वेगवेगळे आहे, परंतु सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खर आहे.
दक्षिण कोरियाचाफुटबॉलपटू सोन हेयुंग-मिन चांगलाच पेचात सापडला आहे. देशसेवा आणि फुटबॉल कारकीर्द अशा कात्रीत तो अडकला आहे. देशसेवा करण्याचा नियम पाळला तर त्याची फुटबॉल कारकिर्द संपुष्टात येईल आणि सुवर्णपदक हा एकमेव मार्ग त्याला या सक्तीच्या सेवेतून मुक्तता मिळवून देऊ शकतो. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील टोटनहॅम हॉटस्पर क्लबचा हा खेळाडू आशियाई स्पर्धेत दक्षिण कोरियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोरियाने फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पण येथून रिकामी हाताने माघारी फिरल्यास त्याला २१ महिन्यांच्या सक्तीची सैन्य सेवा करावी लागेल. कोरियाच्या नियमानुसार वयाची २८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने २१ महिने सैन्य सेवा करणे अनिवार्य आहे आणि २६ वर्षीय सोन याने यालाही हा नियम लागू आहे. पण असे केल्यास त्याची फुटबॉल कारकिर्द धोक्यात येऊ शकते. या सेवेतून सुटका मिळवायची असल्यास त्याला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकावच लागेल. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ४७ गोल करणाऱ्या आशियाई खेळाडूंत सोन अग्रस्थानी आहे.