ब्रेमेन (जर्मनी) : बायर्न म्युनिखने रॉबर्ट लेवानडोवस्की याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर वर्डर ब्रेमेनवर १-० ने विजय मिळवून आठव्यांदा बुंदेसलीगा फुटबॉलचे जेतेपद पटकवले. या संघाचे अद्यापही दोन सामने शिल्लक आहेत. विजयामुळे दुसऱ्या स्थानी असलेल्या डॉर्टमंडवर म्युनिखने १० गुणांची आघाडी संपादन केली. डॉर्टमंड संघाचे तीन सामने शिल्लक असून, तिन्ही जिंकले तरी त्यांना नऊ गुण मिळतील.वर्डरने ब्रायनला पूर्वार्धात रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि चॅम्पियन संघाने अखेर गोल नोंदवलाच. लेवोनडोवस्की याने ४३ व्या मिनिटाला जेरेम बोेटेंगच्या पासवर प्रेक्षणीय गोल केला. बुंदेसलीगाच्या या सत्रात त्याचा हा ३१ वा गोल होता. अल्फान्सो डेव्हिस याला ७९ व्या मिनिटाला रेफ्रीने दुसरे पिवळे कार्ड दाखवताच बायर्नला १० खेळाडूंसह खेळावे लागले. बायर्नच्या गोलकीपरने संघासाठी यशस्वी कामगिरी करीत प्रतिस्पर्धी प्रयत्न हाणून पाडले. कोरोनानंतर मागच्या महिन्यात लीग सुरू झाल्यापासून बायर्नने सात विजय साजरे केले. संघाचे हे एकूण ३० वे जेतेपद आहे. आता ४ जुलै रोजी जर्मन चषकाच्या अंतिम सामन्यात या संघाला बायर लीवरकूसेनविरुद्ध खेळायचे आहे. हा संघ चॅम्पियन लीग जेतेपदाच्या शर्यतीतदेखील कायम आहे. (वृत्तसंस्था)
बुंदेसलीगा फुटबॉल: बायर्न म्युनिखला आठव्यांदा जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:56 PM