नव्या स्टार्सचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:51 AM2018-07-15T04:51:31+5:302018-07-15T04:51:42+5:30
अनेक धक्कादायक निकालांनी २१वी विश्वचषक स्पर्धा यंदा गाजली. ६३ सामन्यांद्वारे फुटबॉल क्षितिजावर नवीन ‘स्टार’ खेळाडूंचा जन्म झाला.
-चिन्मय काळे
अनेक धक्कादायक निकालांनी २१वी विश्वचषक स्पर्धा यंदा गाजली. ६३ सामन्यांद्वारे फुटबॉल क्षितिजावर नवीन ‘स्टार’ खेळाडूंचा जन्म झाला. आजवर फुटबॉल जगताला माहीत नसलेल्या काही जुन्या खेळाडूंनासुद्धा ‘स्टारपण’ याच स्पर्धेने मिळवून दिले. फुटबॉल विश्वचषकातील प्रत्येक सामना काही ठरावीक खेळाडूंभोवती फिरत असतो. ते त्या सामन्यातील ‘स्टार’ असतात. ‘रशिया २०१८’च्याही ६३ सामन्यांत असे ‘स्टार’ मैदानावर दिसले. पण यापैकी अनेक खेळाडू आजवर फुटबॉल जगताला ठाऊक नव्हते. त्या खेळाडूंनी यंदा मैदान गाजवले. भविष्यात या खेळाडूंवर त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असेल. ही ‘रशिया २०१८’ची सर्वांत मोठी देण आहे.
आक्रमक रोमेल लुकाकू
कुणाच्या ध्यानीमनी नसताना बेल्जियमचा संघ चक्क उपांत्य फेरीत धडकला व तोही ब्राझिलला नमवून. या विजयात सर्वाधिक दमदार कामगिरी केली २५ वर्षीय रोमेल लुकाकूने. स्पर्धेच्या बाद फेरीत लुकाकूने चार गोल केले. ब्राझिलविरुद्ध केविन डी ब्रुने याने केलेल्या निर्णायक गोललाही लुकाकूचेच सहकार्य होते.
>
क्रोएशियाचा पेरिसीच
क्रोएशियाच्या संघाची विश्वचषकातील कामगिरी फुटबॉल चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. त्यामुळे या संघातील सर्वच खेळाडू तसे फुटबॉल जगताला नव्याने माहीत झाले. यापैकी संघासाठी स्टार ठरला २९ वर्षीय इव्हान पेरिसीच. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ६९ मिनिटे पिछाडीवर असलेल्या संघाला त्याने अक्षरश: कंबरेच्या वरपर्यंत पाय उचलून आगळा असा पहिला गोल मिळवून दिला. आइसलॅण्डविरुद्ध निर्णायक गोल केला; तसेच स्पर्धेत एका गोलला सहकार्य केले.
>मँडझुकीचची
‘लीला’ वेगळीच
क्रोएशियाच्या धमाकेदार विजयाचे श्रेय लुका मॉड्रीच याच्या धोरणी नेतृत्वाला असले तरी आघाडीवर पेरिसीचच्या साथीने भक्कम आक्रमक फळी निर्माण करण्याचे काम मारिओ मँडझुकीचने केले. हा ३२ वर्षीय खेळाडू तसा जुना असला तरी या स्पर्धेतील त्याचे दोन महत्त्वाचे गोल व एका गोलसाठीचे सहकार्य निर्णायक ठरले.
>इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन
इंग्लिश प्रीमियर लीगच्या चाहत्यांना हॅरी केन तसा नवा नाही. अवघ्या २४व्या वर्षी स्वत: दमदार कामगिरीचे सादरीकरण करीत संपूर्ण संघाला शिस्तबद्ध रीतीने पुढे नेणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन. एका हॅट्ट्रिकसह सर्वाधिक ६ गोल करणारा केन हा या स्पर्धेने दिलेला मोठा ‘स्टार’ आहे.
>डेनिस चेरिशेव
यजमान रशिया पहिल्या सामन्यापासून चर्चेत होता. याचे कारण त्यांनी पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर मिळविलेला ५-० असा विजय. या सामन्यात २४ वर्षीय डेनिस चेरिशेवने दोन गोल केले. त्यानंतर इजिप्तविरुद्ध एक गोल व क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात ह्यडीह्ण क्षेत्राबाहेरून अप्रतिम किकद्वारे गोल करून त्याने ह्यस्टारह्ण असल्याची चुणूक दिली. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात त्याला अनुभवी स्मोलोव्हच्या जागी संधी मिळाली. त्याने डागलेल्या दोन गोल्समुळे पुढील तीन सामन्यांत स्मोलोव्हला संधीही मिळाली नाही.
>अॅन्टोनी ग्रिझमन
युरोपियन लीग खेळ पाहणाऱ्यांना तसा
२७ वर्षीय फ्रेंच खेळाडू अॅन्टोनी ग्रिझमन नवीन नाही. पण ग्रिझमनला या स्पर्धेने संपूर्ण फुटबॉल विश्वाचा ह्यस्टारह्ण बनवले. साखळी फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध गोल केल्यानंतर संभाव्य दावेदार अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सच्या विजयाचे खाते ग्रिझमननेच पेनल्टीवर उघडले. उपांत्यपूर्व लढतीत उरुग्वेसारख्या प्रबळ संघाला फ्रान्सने २-०ने नमवले. हे दोन्ही गोल ग्रिझमननेच नोंदविले होते. याखेरीज स्पर्धेतील एका गोलसाठी त्याने सहकार्यही केले.
>१९ वर्षीय एमबाप्पे
या स्पर्धेने दिलेला सर्वांत मोठा नवीन स्टार म्हणून फ्रान्सच्या कालियन एमबाप्पेकडे पाहिले जात आहे. या खेळाडूचा मैदानावरील वावर एखाद्या सराईत, अनुभवी व मातब्बर खेळाडूसारखा होता. धावण्यातील प्रचंड वेग व ऊर्जा यामुळे प्रसंगी तो संरक्षण ते आक्रमण असे पूर्ण मैदान व्यापतो. त्याच्यातील ही चुणूक उपांत्य फेरीत बेल्जियमविरुद्ध स्पष्ट दिसली.