चेल्सीने पटकावले चॅम्पियन्स लीगचे जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:07 AM2021-05-31T09:07:33+5:302021-05-31T09:07:43+5:30
अंतिम लढतीत मँटेस्टर सिटीवर १-० ने मात
पोर्टो : काई हावर्ट्जने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने परंपरागत प्रतिस्पर्धी मँचेस्टर सिटीचा १-० ने पराभव करीत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. चेल्सीने चॅम्पियन्स लीगचे आपले पहिले जेतेपद ९ वर्षांपूर्वी पटकावले होते. त्यानंतर त्यांना आता यश मिळाले. नवे प्रशिक्षक थॉमस टचेल सत्रादरम्यान संघासोबत जुळल्यानंतर १२३ दिवसांनी चेल्सीने हे यश संपादन केले. जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या क्लब स्पर्धेत सिटी व त्यांचे प्रशिक्षक पेप गार्डियोला यांच्या पदरी अखेर निराशा आली. गार्डियोला जगातील नामांकित प्रशिक्षक आहेत; पण त्यांनी रणनीतीवर गरजेपेक्षा अधिक लक्ष दिल्यामुळे संघाला नुकसान सोसावे लागले. जर्मनीचा फॉरवर्ड हावर्ट्जने ४२ व्या मिनिटाला नोंदविलेला गोल अखेर निर्णायक ठरला. हावर्ट्जसाठी हा गोल महत्त्वाचा होता. सत्रादरम्यान तो कोरोना संक्रमित झाला होता. आजारातून सावरल्यानंतर मोसमाच्या शेवटी चेल्सीतर्फे त्याने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.