साओ पावलो : ‘अ’ गटात समावेश असलेल्या उरुग्वे आणि पॅराग्वे या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. उरुग्वेने बोलिवियाला २-० असे, तर पॅराग्वेनेही चिलीला २-० असा पराभव करत शानदार आगेकूच केली.
‘अ’ गटात बलाढ्य अर्जेंटिनाने सर्वाधिक ७ गुणांसह अव्वलस्थानी राहत बाद फेरीत प्रवेश केला. पॅराग्वे सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. चिली ५, तर उरुग्वे ४ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी राहिले. स्पर्धेत बोलिवियाला गुणांचे खाते उघडता आले नाही.बोलिवियाचा गोलरक्षक कार्लोस लाम्पे याने केलेल्या स्वयंगोलामुळे उरुग्वेला ४०व्या मिनिटाला आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या सत्रात एडिंसन कावानी याने ७९व्या मिनिटाला गोल करत उरुग्वेचा विजय साकारला.
दुसरीकडे, ब्राइयान सामुडियो याने ३३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत पॅराग्वेला चिलीविरुद्ध आघाडीवर नेले. ५८व्या मिनिटाला मिगुल अलमिरोन याने गोल करत पॅराग्वेला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत पॅराग्वेने चिलीला सहज धक्का दिला.
ब्राझीलच्या प्रशिक्षकांची आयोजनावर टीका
कोपा अमेरिका स्पर्धेचे यजमान असलेल्या ब्राझील संघाचे प्रशिक्षक टिटे यांनी स्पर्धा आयोजनावर टीका करत वाद निर्माण केला. टिटे यांनी दक्षिण अमेरिकी फुटबॉल महासंघाच्या (कोनमेबोल) कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनावर टीका केल्याने त्यांच्यावर ५ हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.