ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नंबर सात, काय आहे गुपित?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 12:43 AM2019-02-10T00:43:23+5:302019-02-10T00:43:40+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डो... फुटबॉल विश्वातील सम्राट... त्याच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने अनेकांना वेड लावलं... या ७ क्रमांकामुळे त्यानं स्वत:चं एक वेगळंच ‘सीआर७’ हे ब्रँड तयार केलं आणि आज तो आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला आहे.
मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डो... फुटबॉल विश्वातील सम्राट... त्याच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने अनेकांना वेड लावलं... या ७ क्रमांकामुळे त्यानं स्वत:चं एक वेगळंच ‘सीआर७’ हे ब्रँड तयार केलं आणि आज तो आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला आहे. मँचेस्टर युनायटेड, रेयाल माद्रिद व आता युव्हेंटस क्लब अशा विविध क्लबकडून खेळलेल्या रोनाल्डोचे ७ क्रमांकाशी जोडलेलं नातं आजही कायम आहे. ७ क्रमांकाव्यतिरिक्त अन्य क्रमांकासह खेळताना तो क्वचितच दिसला असेल.
३३ वर्षीय रोनोल्डो जेव्हा युव्हेंटसमध्ये दाखल झाला, त्या वेळी त्याच्यासाठी ज्युआन क्युड्राडोनं ७ क्रमांकाची जर्सी सोडली होती. सुरुवातीला रोनाल्डो स्पोर्टिंग लिस्बनकडून २८ क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता. २००४ साली तो मँचेस्टर युनायटेड येथे दाखल झाला आणि त्यानं २८ क्रमांकाच्या जर्सीची मागणी केली होती, पण... युनायटेडचे महान प्रशिक्षक सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी त्याला ७ क्रमांकाची जर्सी घालण्यास सांगितले. ७ क्रमांकाची जर्सी घालून यशस्वी झालेल्या महान खेळाडूंच्या पंक्तीत रोनाल्डोही स्थान पटकावेल असा त्यांना विश्वास होता.
रोनाल्डोने त्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करताना पहिल्याच सत्रात ४२ गोल केले आणि २००८ मध्ये त्याने पहिला बॅलोन डी ओर पुरस्कारही जिंकला. रेयाल माद्रिदकडून रोनाल्डोने २००९ मध्ये पदार्पण केले. परंतु त्याला सुरुवातीला ९ क्रमांकाच्या जर्सीसह खेळावे लागले. कारण माद्रिदचा दिग्गज रॉल याच्याकडे ७ क्रमांकाची जर्सी होती. २०१० मध्ये त्याने ती जर्सी रोनाल्डोला सुपुर्द केली.
घट्ट समीकरण
ओल्ड ट्रॅफर्डनंतर रोनाल्डो आणि ७ क्रमांक हे समीकरण घट्ट बनलं होतं. त्यामुळे युव्हेंटस क्लबनेही त्याच्यासाठी ७ क्रमांकाचीच जर्सी तयार केली. इटलीच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्येही ७ क्रमांकाच्या जर्सीला महत्त्वाचे स्थान आहे.
पोर्तुगाल संघाकडूनही रोनाल्डो ७ क्रमांकाचीच जर्सी परिधान करतो. सुरुवातीला तो राष्ट्रीय संघाकडून १७ क्रमांकाची जर्सी घालायचा, परंतु दिग्गज खेळाडू लुईस फिगो निवृत्त झाल्यानंतर रोनाल्डोला ७ क्रमांकाची जर्सी देण्यात आली.
फुटबॉल विश्वात ७ क्रमांक लक आणि यश यांचे प्रतीक मानला जातो, त्यामुळेच विशेष करून आक्रमकपटूंना ७ क्रमांकाची जर्सी दिली जाते.