मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. इटालियन लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोने या लढतीपूर्वी गोल करण्यासाठी २७ प्रयत्न केले, परंतु त्याला यश मिळाले नव्हते. गतविजेत्या युव्हेंटसने रोनाल्डोच्या या कामगिरीच्या जोरावर २-१ असा विजय मिळवला. दुसऱ्या सत्रातील पाच मिनिटांनी पाऊलो डिबालाच्या पासवर रोनाल्डोने सीरि ए लीगमधील पहिला गोल केला. या गोलनंतर बऱ्याच कालावधीनंतर रोनाल्डोचा आनंद साजरी करण्याची स्टाईल पाहायला मिळाली. पहिल्या गोलसाठी पोर्तुगालच्या कर्णधाराला ४ सामने, ३२० मिनिट, २७ प्रयत्न प्रतीक्षा करावी लागली. रोनाल्डोच्या गोल करण्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. पण त्याने १५ मिनिटांच्या आत दुसरा गोल करून त्याची गोल्सची भूक संपली नसल्याचा इशारा दिला. पाचवेळा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोला हॅटट्रिक करता आली नाही. सॅसौलोचा गोलरक्षक अँड्री कोंसिग्लीने त्याचा प्रयत्न अडवला. भरपाई वेळेत सॅसौलोच्या खोउमा बॅबकरने गोल केला. दरम्यान, युव्हेंटसच्या डॉगलस कोस्टाला प्रतिस्पर्धीवर थुंकल्यामुळे रेड कार्ड दाखवण्यात आले.