जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:00 AM2021-05-17T05:00:00+5:302021-05-17T05:00:32+5:30
जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपासून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. काही शेतकऱ्यांची शेती नजीकच्या चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात आहे. जिल्हाबंदीमुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. ई-पास असल्याशिवाय सहजासहजी प्रवेश दिला जात नाही.
काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नसल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
कापूस बियाणे खरेदी रखडली
चामाेर्शी तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड हाेते. या तालुक्यातील शेतकरी कापसाची बियाणे गाेंडपिंपरी तालुक्यातून किंवा तेलंगणा राज्यातून खरेदी करून आणतात. गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत त्या ठिकाणी बियाणे स्वस्त मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने त्याच ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी जातात. मात्र यावर्षी जिल्हाबंदी असल्याने बियाणे खरेदी रखडली आहे. अनेक शेतकरी जिल्हाबंदी उठविण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
पावसाळा आता जवळ आला आहे. सर्वच शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. त्यांची कामे ठप्प पडली आहेत. एसपी कार्यालयातून केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्याची मुभा द्यावी.
- मधुकर नीलमवार, शेतकरी.
आमच्या परिसरातील बहुतांश शेतकरी तेलंगणा राज्यातूनच कापूस बियाणे व किटकनाशके खरेदी करून आणतात. त्याठिकाणी गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत स्वस्त दरात बियाणे व किटकनाशके उपलब्ध हाेतात. यावर्षी जिल्हाबंदी असल्याने अजुनपर्यंत बियाणे व किटकनाशके खरेदी केली नाहीत. जिल्हाबंदीतून सुट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
- बाबुराव बट्टे, शेतकरी.
मागील वर्षी सातबारावर मिळत हाेता ई-पास
- मागील वर्षी याच कालावधीत जिल्हाबंदी लागू हाेती. मात्र शेतीचा हंगाम जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारावर ई-पास दिली जात हाेती. ई-पास काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे सातबारा धरून चाैकीजवळ जात हाेते. शेतकऱ्यांच्या हंगामाचा विचार करून पाेलीस विभागही त्यांना जाण्याची परवानगी देत हाेता. यावर्षीही अशाच प्रकारची परवानगी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहे.
- काही कर्मचारी मात्र या सातबाराचा दुरूपयाेग करून ये-जा करीत हाेते. असा दुरूपयाेग हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.